पुणतांब्यात शेतकर्‍यांचे मौन आंदोलन

0
पुणतांबा (वार्ताहर) – राज्य सरकार शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहत नाही. शासनाच्या या कृतीचा निषेध म्हणून पुणतांबा येथील शेतकर्‍यांनी बुधवारी मौन आंदोलन केले.
बुधवारी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर डॉ. धनंजय धनवटे व बाळासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. यावेळी गणेशचे संचालक राजेंद्र थोरात, अ‍ॅड. चांगदेव धनवटे, नामदेव धनवटे, खंडकर्‍यांचे ज्येष्ठनेते निवृत्ती चव्हाण, नारायण थोरात, भाऊसाहेब केरे, बापू धनवटे, अनिल नळे, बाबा खोसे, लहानुभाऊ धनवटे, संजय धनवटे, बाबासाहेब धनवटे, बाळासाहेब भोरकडे, पंडित सांबारे, मुन्ना नवले, किशोर वहाडणे, पंकज नळे, राजू शिरसाठ, निलेश दुरगुडे, ज्ञानदेव शिंदे, सुभाष सांगळे, गोविंद काळे, भास्कर हरे, रामभाऊ पेटकर आदींसह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तोंडाला काळ्या पट्ट्या लावून शेतकर्‍यांनी तासभर मौन पाळले. विशेष मौन असतानाही हातवारे करून, खुणा करून, हावभाव करून शेतकरी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत होते. तासभर आंदोलन झाल्यानंतर शेतकर्‍यांनी स्टेशन रोडवरून फेरी काढली. आंदोलनाचा पहिला टप्पा संपल्यानंतर आता नाशिकच्या कोअर कमिटीने घेतलेल्या निर्णयानंतर पुढील आंदोलन करण्याचा निर्धार आंदोलक शेतकर्‍यांनी व्यक्त केला.
सांगली येथील विजय बाळासाहेब जाधव या शेतकर्‍याने शासनाचे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी येथील आंबेडकर पुतळ्यासमोर बसून उपोषण सुरू केले आहे. ज्या पुणतांबा गावातून शेतकरी आंदोलनाची ठिणगी पडली त्या गावातील शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी मी उपोषण करत असल्याचे श्री. जाधव यांनी स्पष्ट केले.
दरम्यान काल सातव्या दिवशी परिसरातील काही दूध संकलन केंद्रे सुरू झाली. पुणतांबा गावचे माजी सरपंच अ‍ॅड. मुरलीधर थोरात, नवनिर्माण सेनेचे गणेश जाधव, मंगेश खरपास, बबनराव धनवटे, शांती तालभाटी या शेतकर्‍यांनी मुंबई येथे राज ठाकरे यांची भेट घेऊन शेतकरी संपात लक्ष घालण्याचे आवाहन केले.
श्री. ठाकरे यांनी पुणतांब्यात येण्याचे मान्य केल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले. प्रसिध्दीसाठी स्टंट करणारे आंदोलन करणार नसून शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करून शेतीतून किती व कसे उत्पादन काढावे, किती विकावे याबाबतचे मार्गदर्शन करणार असल्याचे श्री. थोरात यांनी सार्वमतशी बोलताना स्पष्ट केले. पुणतांबा येथील आंदोलनात स्थानिक राजकारण येऊ लागत्यामुळे आंदोलनाची धग कमी झाली आहे.

LEAVE A REPLY

*