यापुढे हमीभावासाठी लढा

0

कांदा आणि तुरीची निर्यात बंद करा : पवार

पुणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेली 34 हजार कोटींची कर्जमाफी पुरेशी नाही, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच सरकारने शेतकर्‍यांसाठी उचललेले कर्जमाफीचे पाऊल स्वागतार्ह आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आता स्वामिनाथन आयोगाच्या हमीभाव व अन्य शिफारसी लागू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच कांदा आणि तूरवरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ग्रामीण सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे दोन हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा आहे. त्यामुळे त्या जमा करुन घेण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
सरकारच्या कर्जमाफीमुळे संपूर्ण समाधान झालेले नाही. मात्र हे सरकारचे पहिले पाऊल आहे. काही शेतकरी नेते त्याबाबत आत्ताच नाराजी व्यक्त करू लागलेत. मात्र, हा निर्णय योग्य की अयोग्य याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस इतक्यात बोलणार नाही. त्यासाठी आणखी वेळ द्यावा लागेल आणि सरकारसोबत समन्वयाचीच आमची भूमिका राहील, अशी भूमिका पवारांनी स्पष्ट केली. कर्जमाफी ही 30 जून 2017 पर्यंतच्या थकबाकीदारांना मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने 30 जून 2016 पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला.
काश्मीरमध्ये दररोज देशाचे जवान शहीद होत असताना केंद्र सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. पाकिस्तानसोबत युद्ध करा, असं मी म्हणणार नाही. पण कडक कारवाई गरजेचीच आहे. त्यासाठी देशाला पूर्णवेळी संरक्षणमंत्री असणंही आवश्यक आहे, असं मत शरद पवार यांनी मांडल
शिवाजी महाराज हे गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते, असं विधान शरद पवार यांनी अलीकडेच केलं होतं. त्यांच्या या तर्कावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्याबाबत विचारलं असता पवार म्हणाले की, शिवरायांनी अफझलखानाला मुस्लिम होता म्हणून नाही तर स्वराज्याचा, रयतेच्या राज्याचा शत्रू होता म्हणून मारलं. छत्रपती शिवरायांनी कधी जात – धर्माचा विचार केला नाही.
अफझलखानाला जसा मारला तसा कृष्णाजी कुलकर्ण्यालाही मारला. स्त्रियांबाबत गैरवर्तन करणार्‍या रांझ्याच्या पाटलाचे हात तोडले. बजाजी निंबाळकर, जावळीचे मोरे अशा कित्येकांवर शस्त्र चालवली. पण माझ्या विधानाचे हवे ते अर्थ घेण्यात आले. माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणार्‍यांच्या मनात किती खदखद आहे हे यातून दिसून येतं, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*