आम्ही चूक केलीय का! कर्ज न भरण्याचा शेतकर्‍यांचा निर्णय

0
राहुरी (प्रतिनिधी)- गावातील शेतकर्‍यांनी कोणत्याही बँकेचे कर्ज भरायचे नाही. असा निर्णय घेतानाच संपूर्ण गावच कर्जमुक्त झाल्याची स्वयंघोषणा राहुरी तालुक्यातील पश्‍चिम भागातील वाबळेवाडी ग्रामस्थ शेतकर्‍यांनी केली आहे. याबाबत विशेष ग्रामसभा घेऊन शेतकर्‍यांनी तसा ठराव केला असून ठराव केल्यानंतर गावात गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दरम्यान, शासनाच्या कर्जमाफीचा लाभ येथील शेतकर्‍यांना मिळाला नाही. त्यामुळे आमच्या गावावर अन्याय झाला असून नियमित कर्ज भरणे हा गुन्हा आहे का? असा सवाल संतप्त शेतकर्‍यांनी केला आहे.
या ठरावाच्या प्रती राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे, जिल्हा बँकेच्या शाखाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.
वाबळेवाडी-वरशिंदे ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा कर्जमाफीच्या विषयावर बोलाविण्यात आली होती. यावेळी नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांनी आपली कैफियत मांडली. राहुरी तालुक्यातील पश्‍चिमेकडील डोंगराळ भाग व कोरडवाहू परिसरातील 16 ते 17 गावे तीन वर्षांपासून 50 पैशापेक्षा कमी आणेवारीत आहेत. त्यामुळे शेतीपासून मिळणारे उत्पन्न नगण्यच आहे. तरीही सलग पाच वर्षांपासून गावातील सहकारी सोसायटीचे कर्ज नवे-जुने करण्यासाठी व्याजाने पैसे घेऊन 97 ते 98 टक्के वसूल करून त्याचा बँकेत भरणा केला जातो. त्यासाठी वाढीव कर्ज घेऊन सभासदांवर कर्जाचा बोजा वाढला आहे. यात केवळ दोनच सभासद थकबाकीदार आहेत, अशी माहिती शेतकर्‍यांनी ग्रामसभेत दिली.
शेतकर्‍यांच्या ऐतिहासिक संपामुळे आता हे मायबाप सरकार नियमित कर्ज भरणार्‍यांसाठी योग्य निर्णय घेईल असे वाटले होते. मात्र, नियमित कर्ज भरणार्‍यांवर अन्याय करून थकबाकीदार करण्याचा फतवा काढला आहे. मागीलवर्षी कमी पावसामुळे मूग, सोयाबीन, भूईमुग ही पिके पावसाअभावी करपून गेली होती. मात्र, तरीही शेतकर्‍यांनी उधार-उसनवार करून बँकेचे कर्ज फेडले. मात्र, नियमित कर्ज फेडणार्‍यांवरच अन्याय झाला आहे.
त्यामुळे आता या ग्रामसभेत संपूर्ण गाव कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील कोणत्याही शेतकर्‍यांनी कर्जमुक्त होईपर्यंत कर्ज भरायचे नाही. बँकेत जायचे नाही, अडचण आली तर चटणी-भाकर खाऊन संकटाला सामोरे जायचे, आमचे गाव आम्हीच स्वयंघोषणा करून संपूर्ण कर्जमुक्त केले असल्याचे ग्रामसभेत ठासून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांनीही अशाच गावोगावी ग्रामसभा घेऊन संपूर्ण कर्जमुक्तीची स्वयंघोषणा करावी, सरकारचे 25 टक्के घेण्यापेक्षा आपणच कर्जमुक्त होऊ या, असे आवाहन वाबळेवाडी येथील शेतकर्‍यांनी ग्रामसभेत केले आहे.
ग्रामसभेला आप्पासाहेब वाबळे, तात्याभाऊ वाबळे, विश्‍वनाथ वाबळे, रमेश वाबळे, अरूण वाबळे, राजाबापू वाबळे, ज्ञानदेव वाबळे, शिवराम वाबळे, छबुराव उंडे, रवींद्र वाबळे, दिलीप वाबळे, शरद वाबळे, गोपीनाथ वाबळे, बबन वाबळे, बाबासाहेब वाबळे, दादासाहेब वाबळे, संभाजी वाबळे, संपत वाबळे, प्रशांत वाबळे, अर्जुन वाबळे, संदीप वाळेकर, चांगदेव वाबळे, शिवाजी वाबळे, हौशाबापू वाबळे, गोरक्षनाथ वाबळे, सुधाकर वाबळे, गणपत वाबळे, संदीप कोठूळे, रणजित वाबळे, आप्पासाहेब नेहे, आदींसह महिला व शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

वाबळेवाडी, वरशिंदेसह राहुरी तालुक्यातील पश्‍चिमेकडील अनेक गावे कोरडवाहू व दुष्काळी छायेत आहेत. पिढ्यानपिढ्या येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच शेती करतात. अनेक पावसाळ्यातही या गावांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नसते. पाणी नसल्याने चाराही नसतो. त्यामुळे येथील शेतकरी जनावरेही पाळत नाही. त्यामुळे शेतीपुरक आर्थिक मदतीचा हात देणारा दूग्ध व्यवसायही येथील शेतकर्‍यांना करता येत नाही. या गावांकडे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या कर्जाच्या बोजाखाली असूनही खासगी सावकारांकडून चढ्या व्याजदराने कर्ज घेऊन सोसायटीचे कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांचा भविष्यकाळ अंधःकारमय झाला असल्याची खंत जुन्या शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*