जिल्ह्यात ठिकठिकाणी शासन अध्यादेशाची होळी

0

नेवासा (प्रतिनिधी) – राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भात जाचक निकष लादून शेतकर्‍यांची कुचेष्टा केल्याचा आरोप करत तालुक्यातील शेतकर्‍यांनी नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात कर्जमाफी निकषांच्या परिपत्रकाची जाहीरपणे होळी करत तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.

नेवासा तालुका शेतकरी संघटनेने केलेल्या आवाहनानुसार नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात जमलेल्या शेतकर्‍यांनी बुधवारी सकाळी शासकीय परिपत्रकाची होळी करून तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
लोकप्रतिनिधी बाळासाहेब मुरकुटे शेतकरी नेते म्हणून तालुक्याने विधानसभेत पाठविले. परंतु त्यांनी ठाम भूमिका घेऊन राज्य सरकारकडे कर्जमाफी संदर्भात आग्रह धरण्याऐवजी राजकीय कलगीतुरा करण्यात धन्यता मानत असल्याने ते ‘लोक’नव्हे तर ‘भाजप’ प्रतिनिधी बनल्याची खंत यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

शेतकरी कर्जमाफी ही मुळा बँक, यश मल्टीस्टेट पुरती मर्यादित नसल्याने आमदार मुरकुटे करत असलेल्या बेजबाबदार विधानांचा जाब येत्या काळात त्यांना विचारण्याचा निर्धारही काही शेतकर्‍यांनी यावेळी बोलून दाखविला.
आंदोलनाचे नेतृत्व त्रिंबक भदगले, विश्‍वास जावळे, संभाजी माळवदे, बन्सी सातपुते, कॉ. बाबा आरगडे यांनी केले. आंदोलनात कडूबाळ कर्डिले, पप्पू कांबळे, ज्ञानेश्‍वर सिन्नरकर, बाळासाहेब विटेकर, जगन्नाथ कोरडे, राजेंद्र उंदरे, गणेश झगरे, गणपत मोरे, सतीश निपुंगे, शंभूराजे जंगले, अतुल भदगले, ज्ञानेश्‍वर सोमुसे, संतोष धनक आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

हत्तीवरून साखर वाटण्याची ऐपत आली कोठून? हत्तीवरून साखर वाटण्याची ऐपत आली कोठून?  एके काळी शेतकर्‍यांच्या नावाने गळा काढून तालुका ढवळून काढणार्‍या बाळासाहेब मुरकुटेंची नाजूक आर्थिक परिस्थिती पाहून तालुक्यातील जनतेने लोकवर्गणी करून त्यांना विधानसभेत पाठविले. तेच आमदार मुरकुटे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाला बगल देत राजकीय कलगीतुरा करण्यात मग्न आहेत. त्यांच्याकडे हत्तीवरून तालुकाभरात साखर वाटण्याची ऐपत आल्याचे त्यांचेच विधान खूप काही सांगून जात आहे.- संभाजी माळवदे (आंदोलक)

आमदारकी पणाला लावायला हवी होती
तालुक्यातील शेतकर्‍यांचा गेल्या पावणेतीन वर्षांत भ्रमनिरास करून आता आमदार बाळासाहेब मुरकुटेंचा सुरू असलेला खटाटोप निव्वळ हास्यास्पद आहे. गडाखांनी गाय मारली असेल म्हणून तुम्ही वासरू मारण्याची गरज आहे काय? नेवासा कृषी कार्यालयातील घोटाळा, शनिशिंगणापूर विश्‍वस्त निवडीतील घोटाळा तालुकावासीयांच्या चांगलाच स्मरणात आहे. ज्या शेतकर्‍यांनी मोठ्या आशेने तुम्हाला विधानसभेत पाठविले त्यांच्या प्रश्‍नांवर तुम्ही आमदारकी पणाला लावण्याची अपेक्षा होती.
– विश्‍वास जावळे (आंदोलक)

भेंडा (वार्ताहर) – शेतकर्‍यांन कर्जमाफी देताना जाचक अटी लादणार्‍या शासन निर्णयाची (जीआर) भेंडा येथे शहीद भगतसिंग प्रतिष्ठान, किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बसस्थानक चौकात होळी करण्यात आली.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ. बन्सी सातपुते, किसान सभेचे कॉ. भारत आरगडे, शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे कॉ. शरद आरगडे, रघुनाथ आरगडे, बंडू आरगडे, मिनीनाथ आरगडे, अकबर सय्यद, खंडू पाटील, वसीम पठाण, संदीप पाखरे, भारत आढागळे, प्रल्हाद नाईक, लक्ष्मण आरगडे, किसन यादव, अमोल वैरागर, गणेश तेलतुंबडे, मंजू आढागळे, शशिकांत चव्हाण आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
भेंडा (वार्ताहर) – कोणत्याही अटी न लावता शेतकर्‍यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या वतीने भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाचक अटी असलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. राष्ट्रवादीचे सरचिटणीस गणेश गव्हाणे, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष संजय मिसाळ, उपसरपंच भाऊसाहेब फुलारी, रोहिदास आढागळे, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काळे, संजय राऊत, बाबासाहेब गोर्डे, राजेंद्र क्षीरसागर, बाबासाहेब गव्हाणे आदी उपस्थित होते.

माहेगाव (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील शेतकर्‍यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमुक्तीची दिशाभूल करणार्‍या परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त केला. जोपर्यंत राज्य सरकार जाचक अटी रद्द करून व सरसकट कर्जमाफी देत नाहीत तोपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीत. सर्व शेतकरी सुकाणू समिती बरोबर राहून पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचे अशोक टेकाळे, दादासाहेब टेकाळे, राजेंद्र टेकाळे, नारायण टेकाळे, दिलीप टिके, सुदाम काळे, ओंकार जाधव, अजित जाधव, काशिनाथ घारकर, बाळू जाधव, राहुल टेकाळे आदींनी सांगितले.

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – राज्यातील शेतकर्‍यांच्या संदर्भात कोणताही निश्चित निर्णय न घेता फसवी कर्जमाफी व 10 हजार रुपये देण्यासाठी घातलेल्या जाचक अटीच्या परिपत्रकाची भारतीय कम्युनिस्ट पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील क्रांती चौकात होळी करण्यात आली व शासनाच्या धोरणाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या.
सरकार शेतकर्‍यांची थट्टा करत असून त्यांना शेतकर्‍यांचे काही देणे घेणे नाही. निर्णय जाहीर करायचा व नंतर अटींचा भडीमार करायचे काम सरकार करत आहे. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. तसेच शेतकर्‍यांच्या जीवनात स्थैर्य येण्यासाठी शेतमालाचे बाजारभाव, शेतकर्‍यांना निवृत्तीवेतन आदी मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे अशा भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
या आंदोलनाच्या वेळी भारतीय कम्यनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष लांडे, संजय नांगरे, राम पोटफोडे, बापू राशिनकर, शशिकांत कुलकर्णी, अण्णा गायकवाड तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे उपस्थित होते.

भावीनिमगाव (वार्ताहर) – शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे शासनाने कर्जमाफी बाबत काढलेला किचकट अध्यादेशाची शेतकर्‍यांनी होळी केली. शासनाने कोणतेही निकष न लावता कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी केली.
शासनाने कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असून शेतकर्‍यांना तातडीने 10 हजार रुपये देण्यासाठी काढलेल्या अध्यादेशात अनेक किचकट अटी घालण्यात आल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी भावीनिमगाव येथील शेतकर्‍यांनी गावातील तलाठी कार्यालयासमोर शासनाच्या अध्यादेशाची होळी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण, प्रा. भागवत जरे, माधव काळे, राम मुंगसे, आबासाहेब काळे, बाबासाहेब म्हस्के, महेश काळे, विक्रम घोडके, नंदराम दळे, गणेश काळे, नीलेश कुंभकर्ण आदींसह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी जालिंदर चेडे म्हणाले, शासनाने शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी आहे. यामध्ये असलेल्या जाचक अटींमुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. शासन शेतकरी व शेतीविरोधी धोरण राबवत असून शेतकर्‍याची एकप्रकारे चेष्टा करत आहे. शासनाने कर्जमाफीसाठी कोणतेही निकष व अटी न घालता सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली.
भावीनिमगाव परिसरातील शेतकर्‍यांनी शासनाच्या या अध्यादेशाला व कर्जमाफीच्या अटींना विरोध केला असून शासन विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

*