शेतकरी कर्जमुक्तीसाठी पोतराजांचे आसूड आंदोलन

0

नाशिक । शेतकर्‍यांची कर्जमुक्ती करावी, सन 2011 पूर्वीची थकित (गंगाजळी) कर्जाची वसुली थाांबवावी, कर्जमुक्ती होणार्‍या शेतकर्‍यांचे कृषिपंपांचे वीजबिल माफ करावे आणि डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात आदी मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बळीराजा शेतकरी संघाच्या वतीने कडक लक्ष्मी (पोतराज) आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जमाफीऐवजी कर्जमुक्ती हवी आहे. कारण कर्जमाफीनंतरही शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईतच राहणार आहे. म्हणून शेतकर्‍यांचा सातबारा पूर्णत: कोरा करावा ही मुख्य मागणी आहे. या मागणीसाठी यापूर्वीही महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या अस्थी (रक्षा) गोळा करून आंदोलन केले होते.

तसेच आत्महत्या शेतकर्‍याची अशी प्रतिकात्मक अंत्ययात्राही मंत्रालयावर नेली होती. सातारा येथे राष्ट्रध्वजस्तंभावर तसेच अनेक पदयात्रा आंदोलने केली. पण सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यावेळी पोतराज आंदोलनातून पथनाट्य करीत आहेत, पोतराज देवीला प्रसन्न करण्यासाठी स्वत:च्या अंगावर चाबूक (आसूड) मारून घेतो व रक्त सांडतो.

पण आम्ही मात्र शेतकरी समस्या सोडवण्यासाठी व सरकारला प्रसन्न करण्यासाठी शेतकरी पोतराज बनलो असून आम्ही आमच्या अंगावर आसूड मारून घेत आहोत. सरकारने या आसूड आंदोलनाची दखल घेतली नाही तर येत्या 14 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात बंद करण्यात येईल आणि 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजवंदन करू दिले जाणार नाही, असा इशारा गणेश जगताप, सतीश कुलकर्णी, विजय जाधव यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*