आकारिपडीत शेतकर्‍यांचे पदयात्रेने जाऊन तहसीलदारांना निवेदन

आत्मक्लेष आंदोलनास परवानगी पोलिसांनी का नाकारली-अ‍ॅड. काळे
आकारिपडीत शेतकर्‍यांचे पदयात्रेने जाऊन तहसीलदारांना निवेदन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शेतकरी संघटना व अकारीपडित संघर्ष समितीच्यावतीने शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आत्मक्लेष आंदोलन पुकारले होते. परंतु प्रशासनाने अखेरच्या क्षणी परवानगी नाकारली. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी आत्मकलेश आंदोलनाचे रूपांतर मार्केट यार्ड ते तहसील अशा पदयात्रेत केले. तेथे तहसीलदार प्रशांत पाटील यांना आकारीपडीत जमिनी संदर्भात निवेदन देण्यात आले.

शनिवारी सकाळी अकारीपडीत शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाजार समिती येथे जमले.तेथेच शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सभा घेत शासनाचा शेतकरी विरोधी कृतीचा निषेध करण्यात आला. सभेचे रूपांतर पदयात्रेत करण्यात आले. शेकडो आकारी पडीत शेतकर्‍याची रॅली मार्केट कमिटीपासून महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सय्यद बाबा चौकातून मध्यवर्ती कार्यालयाकडे मोर्चाने गेली.

यावेळी अ‍ॅड. अजित काळे यांनी आकारी पडीत जमिनीची पार्श्वभुमी तसेच त्यासंदर्भातील आंदोलने व न्यायालयीन लढ्यासंबंधीची माहिती दिली. शासनाच्या गृहविभागाने एक दिवस परवानगीचे व नंतर परवानगी नाकारल्याचे पत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दिले. वास्ताविक श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांनी रितसर परवानगी दिली होती. परंतु काहींच्या राजकीय दबावापोटी परवानगी नाकारल्याचा आरोप औताडे यांनी केला.

दरम्यान, ना. विखेपाटील आढावा बैठकीसाठी आले असता अ‍ॅड. काळे व आकारी पडीत कृती समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. ना. विखे पाटील यांनी शिष्टमंडळास शासकीय पातळीवर झालेल्या चर्चेचा तसेच सचिव पातळीवरील झालेल्या बैठकीचा तपशील सांगून आकारीपडीत व खंडकरी शेतकर्‍यांच्या वाटून उरलेल्या जमिनीत शासनाचा सोलर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. शेतकर्‍यांनीही आपली आहे ती जमीन पूर्ण मागण्याचा अट्टाहास न करता अर्धी घ्यावी, म्हणजे ज्या शेतकर्‍याचे दहा एकर क्षेत्र आकारीपडित असेल अशा शेतकर्‍यांनी पाच एकर जमीन शासनाला सदर प्रकल्प उभारण्यास द्यावी. शासन अर्धी जमीन बाधित शेतकर्‍याला देईल अशी चर्चा प्राथमिक स्वरूपात चालू असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी सुरेश ताके व दिलीप गलांडे यांनी आमच्या हक्काच्या जमिनीवर ताबा न घेता सिलिंग मर्यादेनंतर उरलेल्या जमिनीवर सदर प्रकल्प उभारावा अशी सूचना केली. चर्चेअंती पुढील बैठकीच्या वेळी मंत्रालयात सदर खात्याचे सचिव, शासनाचे प्रतिनिधी व शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. काळे व शेतकर्‍यासमवेत बैठक घेऊन त्यावर विचार करून तोडगा काढू, असे आश्वासन ना. विखेपाटील यांनी दिले.

याप्रसंगी किशोर बकाल, युवराज जगताप, हरिभाऊ तुवर, भास्कराव तुवर, पांडुरंग पवार, गंगाधर वेताळ, जितेंद्र भोसले, सोपान नाईक, बबनराव वेताळ, वसंतराव मुठे, बाळासाहेब बकाल, अ‍ॅड. सर्जेराव घोडे, शरद आसने, गोविंद वाघ, डॉ. दादासाहेब आदिक, प्रभाकर कांबळे, अप्पासाहेब आदिक, कॉ. अण्णा पाटील थोरात, दगडू पाटील आसने, साहेबराव चोरमल, आप्पासाहेब काळे, संपतराव मुठे, शिवाजी गायकवाड, भास्कर शिंदे, अनिल आसने, निलेश तोडमल, शालन झुरळे, ताराबाई आसने, पुष्पा आसने, कावेरी आसने, अनिता आसने, शोभा आसने, लिलाबाई गलांडे, लहानबाई वेताळ, सुरेखा कासार, सखुबाई ताके, सतीश नाईक, बबन नाईक, राजू गिरे, एकनाथ गायके, रमेश गायके, पांडुरंग बांद्रे, ज्ञानदेव डोके, रामदास खोत, सुरेश डाके, दत्तात्रेय गुळवे, प्रकाश ताके, जनार्दन दळे, प्रवीण गुळवे, संजय वमने, सचिन वेताळ, बाबासाहेब वेताळ, सुरेश वेताळ, रामकृष्ण वेताळ, गोरख वेताळ, बाळासाहेब वेताळ, बबनराव वेताळ, विठ्ठल वेताळ, चंद्रभान वाघ, सिताराम पंडित, बाळासाहेब पंडित, रोहिदास पंडित आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com