कर्जमुक्तीसाठी आरपारची लढाई

सेनेचा भाजपवर घणाघात; जुलैत विधिमंडळावर निर्धार मोर्चा

0
नाशिक | दि. १७ प्रतिनिधी  – शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने आता भाजपविरोधात थेट दोन हात करण्याचा निर्धार केला आहे. याचे रणशिंग नाशिकमधून फुंकले जाणार असून शेतकरी कर्जमुक्तीसाठी आता थेट आरपारची लढाई लढण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे. शेतकरी कर्जमुक्तीसाठी जुलैमध्ये विधिमंडळावर भव्य शेतकरी मार्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार असल्याचे शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकार शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी त्यांच्या व्यथेचे राजकारण करतेय, अशी घणाघाती टीका करत नेतेद्वयींनी सरकारविरोधात निशाणा साधला. नाशिकमध्ये शिवसेनेच्या वतीने १९ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कृषी अधिवेशनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या अधिवेशनाची भूमिका स्पष्ट करताना देसाई म्हणाले, मराठवाडा व विदर्भातील शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर असे लक्षात आले की, शेतकर्‍यांना गेल्या दोन वर्षांपासूनचे पीकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत.

शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचलेला नाही. तुरीचा विषय गंभीर होत चाललाय. याकरिता शिवसेनेने दक्षता पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या पथकामार्फत या तक्रारींची चौकशी केली जाईल आणि याप्रश्‍नी सरकारला जाब विचारला जाईल. यापूर्वीही शिवसेनेने शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर आंदोलन छेडले आहे. आता शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने सरकारविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.

ङ्गमी कर्जमुक्त होणारच, गर्जतो शेतकरीफ अशी गर्जना या अधिवेनात होणार आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना एक वैचारीक अधिष्ठान लाभावे याकरिता या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांच्यासह शेतकर्‍यांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

कृषिप्रधान देशात शेतकरी हा सतत पीडित घटक राहिला आहे. याचा अर्थ आम्ही सत्तेत असलो म्हणजे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर बोलायचे नाही, असे होत नाही. त्यामुळे सत्तेत असलो तरी आम्ही सध्या देणार्‍यांच्या नव्हे तर मागणार्‍यांच्या भूमिकेत आहोत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना विधानसभेवर भव्य राज्यव्यापी निर्धार मोर्चा काढणार असून कर्जमुक्तीसाठी आरपारची लढाई लढणार आहे, असे देसाई यांनी सांगितले.

‘समृद्धी’विरोधात एल्गार
‘समृद्धी’प्रश्‍नी सेना शेतकर्‍यांसोबत आहे. समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा स्वप्नवत प्रकल्प असला तरी समृद्धी महामार्गाच्या नावाखाली सरकारला शेतकर्‍यांची थडगी आम्ही बांधू देणार नाही. याकरिता अधिवेशनात समृद्धीप्रश्‍नी चर्चा होणार आहे. यानंतर पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका विशद करू, असे खा. राऊत यांनी सांगितले.
सरकारच्या स्थैर्यासाठी सोबत : राऊत
आम्ही सत्तेत असलो तरी केवळ सरकार स्थिर राहावे म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आज देशात प्रथमच शेतकरी संपावर जातोय, मात्र शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी मुख्यमंत्री शेतकर्‍यांच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. फूट कसली पाडता, प्रश्‍न सोडवा, अशी टीकाही खा. राऊत यांनी केली.

आज शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर घडताहेत. विशेष करून नाशिक जिल्ह्यात याचे प्रमाण अधिक आहे. म्हणून पक्षप्रमुखांनी अधिवेशनासाठी नाशिकची निवड केली. या अधिवेशनातून पक्षाची पुढील भूमिका मांडली जाणार आहे.

शेट्टी शिवसेना व्यासपीठावर येणार
या अधिवेशनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हेही उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शेट्टींनी शेतकरी प्रश्‍नावर आत्मक्लेश आंदोलन छेडले आहे.

त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून शेट्टी सेनेसोबत आहेत. खोत हे शेट्टींचे प्रतिनिधी असल्याने याबाबत आपण शेट्टींना विचारावे, असे सांगत या अधिवेशनात आमच्या विचारधारेशी सहमत नसलेलेही या अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत.

LEAVE A REPLY

*