मोदीजी सांगा आता कोणते पिक घेऊ?

0

शासनाच्या आयात धोरणामुळे शेतकर्‍यांचे पंतप्रधानांना पत्र

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- नैसर्गिक संकटाचा सामना करताना पुरत्या मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍याला सरकारच्या आयात धोरणामुळे प्रचंड फटका बसला आहे. गेल्यावर्षी सरकारने सोयाबीन तेल, डाळी इतर देशांकडून मागवल्या होत्या, परिणामी, शेतकर्‍यांचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा सरकारने कोणता माल आयात करणार हे जाहीर करावे, जेणे करून शेतकर्‍यांना योग्य पिकांचे नियोजन करता येईल, अशी आर्त साद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीरामपूरच्या शेतकर्‍यांनी पत्राव्दारे घातली आहे.
सरकारने हवामानावर आधारीत पिके घेण्याचे आवाहन केले आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तशाप्रकारे मान्सूनने दमदार एन्ट्रीही केली आहे. अशा परिस्थितीत योग्य पिकांचे नियोजन करण्याचे शेतकर्‍यांसमोर आव्हान आहे. मात्र त्यासाठी सरकारनेही आपल्या आयात-निर्यात धोरणांचे स्पष्टीकरण करणे शेतकर्‍यांसाठी महत्वपूर्ण बनले आहे. सन 2015-16 चा आढावा घेतला असता सरकारने 40 लाख मे. टन. व सन 2016- 17 मध्ये 33 लाख मे. टन. इतके सोयाबीन तेल अमेरिकेकडून आयात केले होते. याशिवाय इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात डाळी आयात केल्यामुळे महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील कडधान्य उत्पादक व सोयाबीन उत्पादक शेतकरी तोट्यात गेले होते.
देशाची लोकसंख्या, त्यासाठी आवश्यक असलेले कडधान्य व अन्य शेतमाल लक्षात घेता यावर्षी सरकार नेमके कोणता शेतमाल किंवा पक्का माल आयात करणार ? हे अगोदर जाहीर करावे. ते समजल्यास संबधित पिक घ्यायचे की नाही, याविषयी शेतकरी ठोस निर्णय घेऊ शकेल व योग्य आणि चांगला भाव पदरात पडेल, अशाच पिकांचे नियोजन करू शकले. त्यामुळे हवामानावर आधारीत शेती करताना किमान सरकारच्या अनिश्‍चित आयात धोरणांमुळे तरी शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही, अशी व्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, चंद्रकांत उंडे, जितेंद्र भोसले, भरत आसने, दत्तात्रय लिप्टे, भास्करराव थोरात, ईश्‍वर दरंदले, प्रतापराव पटारे, सुभाष पटारे, बाळासाहेब भालेराव, बाळासाहेब वरकड, राजेंद्र भांड, राजेंद्र थोरे, सोपानराव भांड आदी शेतकर्‍यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राव्दारे मांडली आहे.

 

LEAVE A REPLY

*