शिवसेनेच्या रेट्यामुळेच कर्जमाफी

0

शेतकर्‍यांच्या हितासाठी सत्तेची पर्वा नाही : उध्दव ठाकरे

शिर्डी ,पुणतांबा (प्रतिनिधी) – 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार विकासाचे खोटे स्वप्न जनतेला दाखवत आहे. शेतकर्‍यांना खड्ड्यात घालून सरकारचे विकासाचे स्वप्न पूर्ण होणार नाही. शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली पाहिजे ही सुरवातीपासूनची शिवसेनेची भूमिका होती. सेनेच्या रेट्यामुळेच शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी शिवसेना सत्तेची पर्वा करणार नाही असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला.
राज्यातील शेतकर्‍यांनी न्याय हक्कासाठी संप पुकारला, त्याची सुरुवात पुणतांबा येथून झाली. तमाम शेतकर्‍यांच्या वतीने येथील शेतकर्‍यांचे ऋण फेडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी मंत्री रामदास कदम, मंत्री दिवाकर रावते, मंत्री दादासाहेब भुसे, शिवसेना पक्षाचे सचिव विनायक राऊत, खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार सुनिल शिंदे, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, कमलाकर कोते, सचिन कोते, डॉ. अशोक विखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणतांब्यातील शेतकर्‍यांच्या लढ्यात प्रमुख भुमिका बजावलेल्या डॉ. धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुहास वहाडणे, बाळासाहेब चव्हाण, धनंजय धोर्डे या शेतकरी नेत्यांचा सत्कार उध्दव ठाकरे यांनी केला.
यावेळी उध्दव ठाकरे यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, शेतकर्‍यांच्या आंदोलनाला राजकीय स्वरूप मुख्यमंत्र्यांनी देण्याचा प्रयत्न केला.
सरकारमधील काही लोक शेतकर्‍यांना साले म्हणाले. पण याच सरकारचा माज उतरवण्याचे काम राज्यातील शेतकर्‍यांनी केले. पडद्यामागुन वार करण्याची आमची औलाद नाही तर सदेह शेतकर्‍यांच्याच पाठीशी आम्ही उभे आहोत. शेतकरी दारूवाला मल्ल्या नाही. सरकारने देशातील मोठ्या उद्योगपतींचे 20 लाख कोटी कर्ज माफ केले. मात्र त्याच सरकारला अन्नदात्याचा आवाज ऐकायला येत नाही.
शेतकर्‍यांचा आवाज ऐकू न येणार्‍या सरकारला मी माझे सरकार समजत नाही. सरकारने नोटबंदी करून राज्यातील शेतकर्‍यांना सर्वाधिक अडचणीत आणण्याचे काम केले. शेतकर्‍यांच्या बँका म्हणून ओळख असलेल्या जिल्हा बँकाना टाळे लावून शेतकर्‍यांनाच आर्थीक अडचणीत आणण्याचे काम सरकारने केले आहे. सहकारी बँकातील दोषींना शिक्षा जरूर करा, पण शेतकर्‍यांच्या मुळावर सरकारने उठता कामा नये. यापुढे शेतकर्‍यांना डिवचण्याचा प्रयत्न केला तर या सरकारला जागेवर ठेवणार नाही असा गंभीर इशाराही दिला.
सरकार 2019 मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विकासाचे स्वप्न दाखवत आहे. तुमचे विकासाचे स्वप्न खड्ड्यात घाला. प्रथम शेतकर्‍यांना न्याय द्या. मग उद्याचे स्वप्न दाखवा. राज्यात तुरीचे व इतर अन्नधान्याचे उत्पादन प्रचंड झाले असताना सरकारने शेतमाल आयात करून शेतकरी देशोधडीला लावला आहे. पारदर्शकतेचा आव आणणारे सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर झोपेचे सोंग घेत आहे. सरकारच्या शेतकरी धोरणामुळेच राज्यात शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा उद्रेक झाला.
आपण सत्तेची पर्वा न करता शेतकर्‍यांच्या पाठीमागे उभे राहाण्याची प्रथमपासूनच भूमिका घेतली. शेतकर्‍यांच्या या लढ्याला यश मिळाले त्याचे श्रेय शेतकर्‍यांनाच आहे. भविष्यात शेतकरी हितासाठी आम्ही शेतकर्‍यांबरोबरच राहू. शेतकर्‍यांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास सरकारमधील लोकांना रस्त्यावर फिरणे मुस्कील होईल. काही राष्ट्रीयकृत बँका शेतकर्‍यांच्या अडवणूक करीत आहेत.
त्या बँकांच्या अधिकार्‍यांना काळे फासून जाब विचारण्याचे काम शिवसैनिक करतील. असा इशारा देतानाच शेतकरी आंदोलना दरम्यान शेतकर्‍यांवर दाखल झालेले गु्न्हे मागे घ्यायला सरकारला भाग पाडू व गुन्हे दाखल करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांची चौकशी सरकारने करावी अशी मागणीही त्यांनी केली. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे जेष्ठ बंधू डॉ. अशोक विखे आज उध्दव ठाकरे यांच्यासमवेत व्यासपिठावर उपस्थित होते. उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख करून आम्हाला तुमच्या भाऊबंदकीच्या राजकारणात पडायचे नाही. मात्र तुमच्या शाळेच्या कामात आडवे येणारांचा बंदोबस्त आम्ही करू. असे ठाकरे यांनी स्पष्ट करून विखे कुटूंबियाच्या वादाबाबत अधिक बोलणेे टाळले.
यावेळी भास्करराव नवले, शिवसेना नेते अनिलराव नळे, शिवसेना तालुका प्रमुख आबासाहेब नळे, पुणतांबा शहर प्रमुख मुन्ना नवले, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष संपर्क प्रमुख दत्ताजी आव्हाड, शिवसेना ग्राहक संरक्षणचे जिल्हा प्रमुख मुकुंद शिनगर, शिवसेना ग्राहक संरक्षण जिल्हा कक्ष कार्यालय प्रमुख अ‍ॅड. राहुल नवले, रवींद्र नवले, शिवसेना राहाता तालुका प्रमुख कमलाकर कोते, उपजिल्हा प्रमुख नाना बावके व उपजिल्हा प्रमुख रामदास गोल्हार, नेवासा तालुका प्रमुख बाळासाहेब पवार,
कोपरगाव तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, कोपरगाव तालुका प्रमुख विजय काळे, उपतालुका प्रमुख विट्ठल पवार, सावळेराम डांगे, सोमनाथ गोरे, पंकज नळे, संभाजी नळे, सोमनाथ खोसे, सद्दम तांबोळी, अनिल शिंदे, नाना तांबे, सदानंद नवले, गोविंद कचरे, विनायक जगताप, रवींद्र सोनवणे, संजय डंबाळे, ज्ञानेश्‍वर काका जाधव, सुनिल धनवटे, शाम धनवटे, चंद्रकांत डोखे, बाबा खोसे आदींसह हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचलन राजश्री पिंगळे यांनी केले.
*विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना उध्दव ठाकरे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या आंदोलनात फुट पाडणारे आम्हाला सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला देतात. आम्ही बाहेर पडल्यावर तुम्हाला आत (सरकारमध्ये) जायचे आहे का? असा सवाल करून यापुढे शेतकर्‍यांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही.
*कर्जमाफीचा निर्णय शेतकरी व शिवसेनेमुळेच-
राज्यातील शेतकर्‍यांच्या ऐतिहासीक लढ्याला यश मिळाले आणी सरकारला कर्जमाफी करावीच लागली. कर्ज माफीसाठी शिवसेना प्रथमपासूनच आग्रही होती.सरकारमध्येही व बाहेरही शिवसेनेने प्रखर भुमिका घेऊन सरकारला कर्जमाफी द्यायला भाग पाडले. या कर्जमाफीचे श्रेय प्रथम शेतकर्‍यांनाच जाते, त्यानंतर शिवसेनेला. आता कर्जमाफीनंतर श्रेयासाठी अनेकजण धंडोरा पिटवण्यासाठी गावोगाव जातील. पण शेतकरी त्यांना फसणार नाही.
*

LEAVE A REPLY

*