कर्जमाफीपूर्वीच आधारलिंकसाठी शेतकर्‍यांची लूट

0

महा ई-सेवा केंद्र चालकांची मनमानी

अहमदनगर (प्रतिनिधी) – कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना आधार लिंक करणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या महा-ई सेवा केंद्रामध्ये शेतकर्‍यांची गर्दी होत आहे. मात्र, नियमानुसार आधार लिंकसाठी 10 रुपये शुल्क असताना केंद्रचालक 50 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम घेऊन अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांची आर्थिक लूट करत असल्याचे दिसून येत आहे.
सरसकट कर्जमाफी न केल्याने शेतकर्‍यांच्या भावना अद्याप तीव्र आहेत. त्यातच कर्जमाफी करताना अटी व शर्ती घातल्याने अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. संपावर जाण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत सरकारला झुकायला लावणार्‍या नगर जिल्हातच आधारलिंकच्या नावाखाली लूट होते, हे विशेष आहे.
दुष्काळ, नापिकी, मालाला हमी भाव नाही, अशा अडचणींना तोंड देत बळीराजा स्वतःला सावरत असताना पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. त्यातच त्याला आता दिवसाढवळ्या लुटले जात असताना तालुका व जिल्हा प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त केला जात असून संबंधितावर कारवाई होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • सध्या जिल्हा प्रशासनामार्फत चालणारी अधिकृत आधार नोंदणी केंद्रे बंद आहेत. त्यामुळे आधारनोंदणी व दुरुस्तीसाठी जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी खासगी केंद्रांकडून गोरगरीब व गरजवंताची आर्थिक लूट केली जात आहे. एखाद्या व्यक्तीला आधारकार्डाची गरज असल्यास अव्वाच्या सव्वा दर आकारला जातो. मात्र, अनेकजण आपले काम महत्त्वाचे असल्याने तक्रारीकडे दुर्लक्ष करतातऊ त्यामुळे  दुकानदारांचे फावत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने बाबनिहाय शुल्क ठरवून दिले असताना अधिक शुल्क आकारले जात असल्याने साशंकता निर्माण होत आहे.
  • तक्रार केल्यास तात्काळ कारवाई – आधार लिंकसाठी 10  रूपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. याशिवाय  नावीन, दुरुस्ती व विविध बाबींसाठी केंद्रचालकांना दर निश्‍चित करून देण्यात आले. त्यापेक्षा अधिक शुल्क आकरणार्‍या केंद्र चालकांविरोधात यापूर्वी तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे. अद्याप असा प्रकार असल्यास तक्रार प्राप्त होताच त्या चालकांचा परवाना रद्द करण्यात येईल.        – अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग)

 

LEAVE A REPLY

*