सरसकट कर्जमाफी हवी : आज चक्काजाम

1
 शेतीमालाला हमी भाव द्या, शेतीमालाला हमी भाव द्या, स्वामीनाथन शिफारशी लागू करा
अहमदनगर (प्रतिनिधी) – सरकारने दिलेली कर्जमाफी मान्य नसल्याचे सांगत, जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी शेतकर्‍यांच्या सुकाणू समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोमवार 14 ऑगस्टला नगर जिल्ह्यासह राज्यभरात चक्का जाम आंदोलनाची घोषणा करत स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू न देण्याचा इशाराही सुकाणू समितीने दिला.
या पार्श्‍वभूमीवर नगर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले, नेवासा, शेवगावसह जिल्ह्याच्या अन्य भागात हे आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली खरी; परंतु सरकारचे निकष आणि जाहीर केलेल्या कर्जमाफीला सुकाणू समितीचा विरोध आहे.  कर्जमाफीसाठी अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरण्याच्या रांगेत मरत आहेत. नोटाबंदी व पीक विम्याच्या रांगेत लोक मेले आता कर्जमाफीसाठी असलेल्या रांगांचा नंबर  लागल्याचे सांगून त्यांनी केवळ जाचक अटींमुळे राज्यातील 40 टक्के शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिल्याचे सांगितले.
सरकारने ऑनलाईनचा दुराग्रह धरला आहे. यातून शेतकर्‍यांची कोंडी केली जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची कर्जमाफी संदर्भात केलेली घोर फसवणूक आणि दिशाभूल करुन आंदोलन हाणून पाडण्याचा केलेला प्रयत्न लक्षात घेऊन किसान क्रांती आंदोलनाच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने जाहीर केलेल्या चक्काजाम आंदोलनाचा एक भाग म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा या ठिकाणी सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीरामपूर तालुका सुकाणु समितीच्या वतिने करण्यात आले आहे.
पुणतांबा वार्ताहराने कळविले की, शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सुकाणू समितीने जाहीर केल्यानुसार 14 ऑगष्ट रोजी राहाता येथील शिवाजी चौकात आयोजित केलेल्या चक्काजाम आंदोलनात पुणतांब्यासह राहाता तालुक्यातीत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे अशी माहिती सुकाणू समितीचे समन्वयक बाळासाहेब चव्हाण यांनी दिली आहे.
पुणतांबा येथील शेतकर्‍यांनी संप करून राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे, मात्र जाचक अटींमुळे या कज माफीचा फायदा पाच टक्के शेतकर्‍यांनाही झाला नाही. तसेच शेतमालाला हमीभाव व स्वामीनाथन समितीच्या शिफारशीबाबत राज्य सरकारने कोणतीही ठोस कृती केली नाही. सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे राज्यात तालुक्याच्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

*