आषाढी एकादशीनिमित्त महामार्ग बसस्थानकावरून जादा बसेस

0
नाशिक । जिल्ह्यातून पंढरपूरला आषाढी एकादशी यात्रेनिमित्त जाणार्‍या भाविकांचा कल लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाने जादा बसेसचे नियोजन केले आहे. सध्या महामार्ग बसस्थानकावरून दिवसाला तीन जादा बसेस पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत.

आषाढी एकादशीला जाणार्‍या भाविकांची संख्या जिल्ह्यातून अधिक असते. त्यातही वारकरी एस.टी.ला प्राधान्य देतात. त्यामुळे एस.टी. दरवर्षी जिल्ह्यातील 17 आगारांतून जादा बसेस पंढरपूरकडे सोडण्याचे नियोजन करते.

यामुळे एस.टी.च्या उत्पन्नात भर पडते. यंदाही एस.टी.ने आषाढी एकादशीला जादा बसेस यात्रेनिमित्त सोडण्याचे ठरवले आहे. त्या पार्श्वभूमीवर महामार्ग बसस्थानकावरून दिवसाला तीन बसेस पंढरपूरकडे रवाना होत आहेत. यात्रा अजून सात दिवस लांब असल्याने प्रवाशांची बसेसला मोजकी संख्या लाभत असली तरी या मार्गावर असलेल्या फेर्‍यांना प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असल्याचे महामार्ग बसस्थानक व्यवस्थापकांनी माहिती देताना सांगितले.

पंढरपूरकडे जाणार्‍या गाड्यांना थांबण्यासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखाना बसस्थानकामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या बसस्थानकात नाशिकसह धुळे, जळगाव, अ.नगर जिल्ह्यातील आगारांच्या गाड्याही थांबणार आहेत. यात्रा कालावधी 30 जून ते 10 जुलै असा असल्याने बसस्थानकावर प्रवासी नियंत्रणाचे एस.टी. महामंडळाने नियोजन पूर्ण केले आहे. भीमा, चंद्रभागा आणि विठ्ठल सहकारी साखर कारखाना या तिन्ही बसस्थानकांवर बस फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी उपाहारगृहे, फ्लेक्सवरून माहिती, संगणकीकृत उद्घोषणा, नकाशे, मार्गदर्शक सूचना, यात्रा शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दुरुस्ती केलेले अंतर्गत रस्ते, बसस्थानकांची स्वच्छता, बसगाड्या थांबण्यासाठी जागा, चौकशी कक्ष, विजेचा अखंडित पुरवठा अशी व्यवस्था एस.टी. महामंडळाने केली आहे.

LEAVE A REPLY

*