अकरावीसाठी दोन टप्प्यात प्रवेशप्रक्रिया

0
नाशिक : यंदा प्रथमच अकरावीच्या ऑनलाईन केंद्रीभूत पद्धतीच्या प्रवेशप्रक्रियेस 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 2 ते 10 जूनदरम्यान शाळांमार्फत विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरून घेणे, दुसर्‍या टप्प्यात महाविद्यालय निवडीची प्रक्रिया असेल. 2 जूनपासूनच विद्यार्थ्यांना शाळांमार्फत माहितीपुस्तिका वितरित केल्या जाणार आहेत.

अकरावी प्रवेशप्रक्रियेसंदर्भात गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापकांची कार्यशाळा झाली. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, प्रवेशप्रक्रियेचे समन्वयक एस. जी. आवारी, आर. जी. जाधव, सहाय्यक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, उपशिक्षणाधिकारी एस. जी. मंडलिक, सुनीता धनगर, ए. एम. बागुल, के. डी. मोरे आदी उपस्थित होते. कार्यशाळेत वैभव सरोदे यांनी स्लाईड शोद्वारे ऑनलाईन प्रवेशाविषयी माहिती दिली. अकरावीची प्रवेशप्रक्रिया दोन टप्प्यात होईल.

पहिल्या टप्प्यात 2 जूनला माध्यमिक शाळेतून अर्जाचा भाग-1 भरावा लागेल. यात विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, इ-मेल, आरक्षण इत्यादी प्राथमिक माहिती असेल. माहिती योग्य असल्याची खात्री मुख्याध्यापकांनी केल्यानंतर अर्जाची प्रिंट निघेल. विद्यार्थ्यांना हा अर्ज भरण्यासाठी 10 जूनपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. दहावीचा ऑनलाईन निकाल लागल्यानंतर दहा दिवसांच्या आत प्रवेश अर्जातील भाग-2 पूर्ण केला जाईल. यात विद्या शाखा, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवता येईल.

प्रवेशप्रक्रियेविषयी माहितीपुस्तिका शाळांना 31 मेपूर्वी उपलब्ध होतील. शाळांमार्फत 2 जूनपासून विद्यार्थी-पालकांना माहितीपुस्तिकेचे वितरण होईल. त्यासाठी 150 रुपये शुल्क असेल. माहितीपुस्तिकेतून विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी, पासवर्ड दिला जाईल. पुस्तिकेसाठी विद्यार्थ्यांना दहावीचे प्रवेशपत्र दाखवणे आवश्यक असेल.

LEAVE A REPLY

*