अकलापूर आश्रमशाळेने राबविली विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया

0
बोटा (वार्ताहर) – जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाकडे पाहिलं जातं, मात्र जागतिक स्तरावर हा लौकिक असला तरी प्रत्यक्षात मतदानातील टक्केवारी, उमेदवाराची पात्रता आणि निवडून आलेल्या उमेदवाराचे कर्तव्य पाहिलं तर निराशाजनक चित्रच पहायला मिळतं. हे चित्र भविष्यात असचं राहू नये आणि त्यासाठी विद्यार्थी दशेतच भारतीय निवडणूक प्रक्रियेबद्दल आकर्षण निर्माण होऊन त्याबाबत जागरूकता आणि सजगता असावी या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील शासकीय आश्रम शाळेने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक अभिनव पद्धतीने पार पाडली. शाळा व्यवस्थापनाच्या विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणुकीत विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभागी होत भविष्यातील आदर्श नागरिक होण्याची चुणूक दाखवली.
उमेदवारी, प्रचार, मतदान, मतमोजणी, आणि जल्लोष कोणत्याही पंचवार्षिक निवडणुकीत दिसणारे हे चित्र आहे. हेच चित्र पहायला मिळाले ते संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील शासकीय आश्रम शाळेत. अकलापूर येथील आदिवासी विकास विभाग संचलित शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय हे तालुक्यातील एक आदर्श विद्यालय म्हणून परिचित आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवणे हा पायंडाच या विद्यालयाने पाडला आहे. त्यातूनच आजचे विद्यार्थी हे उद्याचे आदर्श नागरिक असावेत आणि मुख्य म्हणजे लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणार्‍या निवडणूक प्रक्रियेत त्यांचा यथोचित सहभाग असावा या उद्देशाने विद्यालय व्यवस्थापन मंडळाने वसतिगृह विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया जशीच्या तशी राबवली.
वसतिगृहासाठी मुख्यमंत्री अनिल दुधवडे, भोजनमंत्री आरती जाधव, आरोग्यमंत्री शीतल पवार, अभ्यासमंत्री सुरज खंडागळे, शिस्तमंत्री मच्छिंद्र दुधवडे, स्वच्छतामंत्री स्वप्निल मधे, सांस्कृतिक मंत्री छकुली गावडे, क्रीडामंत्री विकास बर्डे यांची निवड झाली. त्यासाठी पहिली ते पाचवी, सहावी ते नववी आणि दहावी ते बारावी असे विद्यार्थी मतदारांचे वर्गीकरण करून 8 विद्यार्थी मंत्र्यांसाठी निवडणूक घेण्यात आली. या मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी चक्क 27 विद्यार्थी-विद्यार्थिनी उमेदवारांनी निवडणूक लढवली.
शाळेतील 486 विद्यार्थ्यांनी मतदान केले. एकूण 97 टक्के मतदान झाले. विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागातून संपूर्ण लोकशाही पद्धतीने ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रसाद माळी, ज्ञानेश्‍वर भांगरे, गीताराम लेंभे, सुनीता शेंगाळ, शीतल बर्डे, पूजा मुठे यांनी कामकाज पाहिले. त्यांना प्राचार्य जी. डी. भांड, अधीक्षक दिलीप गुंजाळ, डी. ए. शेख यांच्यासह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*