2 हजार भावी मतदारांनी दिली लोकशाहीची परीक्षा

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणूक प्रक्रिया, मतदानाच्या पद्धती, खासदार, आमदारांच्या निवडी कशा होतात. यासह भारतीय समाजशास्त्राविषयी भावी मतदारांना (विद्यार्थ्यांना) कितपत ज्ञान आहे, हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या सुमारे 2 हजार विद्यार्थ्यांची शुक्रवारी जिल्हा निवडणूक विभागाने स्पर्धा परिक्षा घेतली. या परीक्षेच्या निकालानंतर प्रत्येक तालुक्यातून उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थ्यांची 15 नोव्हेंबरला जिल्हास्तरावर पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. आयोगाच्या या नवीन निर्णयामुळे मतदार जागृतीला हातभार लागण्यास मदत होणार आहे.

 

निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षापासून मतदार जागृती मोहीम हाती घेतली असून, मतदानाचा टक्का वाढून लोकशाही अधिक सृदृढ करण्यासाठी मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती महत्त्वाची असल्याचे ओळखून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आता वयाच्या अठरा वर्षांच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रिया, निवडणूक पद्धती, निवडणूक आयोग याबाबत आकर्षण निर्माण होण्यासाठी सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा घेणाचे ठरविले आहे.

 

 

साधारणत: 14 ते 17 वयोगटांतील विद्यार्थ्यांना त्यासाठी परीक्षार्थी ठरविण्यात आले आहे. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न पत्रिका असणार आहे, त्यासाठी 39 प्रश्न आयोगाने निश्चित केले आहेर्त. मात्र, स्थानिक पातळीवर त्यात निवडणुकी संदर्भात आणखी काही प्रश्न यंत्रणेला आवश्यक वाटत असतील तर प्रश्नांची संख्या वाढविण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

 

विद्यार्थ्यांचे समाजशास्त्राबाबतचे ज्ञान जाणून घेणार्‍या प्रश्नांचा या प्रश्नपत्रिकेत समावेश आहे.
मतदार नोंदणीसाठी किती वय असावे, त्यासाठी कोणता अर्ज भरावा, भारतात कोणती मतदान पद्धती आहे, ईव्हीएमचा पूर्ण अर्थ काय, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे, किती वर्षे वयोगटातील व्यक्ती उमेदवारी करू शकतो, लोकसभेची निवडणूक किती वर्षांनी, राज्यसभेची निवडणूक किती वर्षानंतर होते अशा अनेक प्रकारचे प्रश्न या परीक्षेत विचारण्यात येणार आहेत.

 

जिल्हा निवडणूक शाखेने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवारी ही परीक्षा घेतली. 14 तालुक्यातून या परीक्षेसाठी प्रत्येकी 100 ते 150 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रत्येक तालुक्यातून 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्यांची जिल्हा पातळीवर पुन्हा स्पर्धा परीक्षा होणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी 4 विद्यार्थ्यांची राज्यपातळीवर निवड केली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

*