जिल्हा नियोजन समिती : निवडणुकीत नगरसेविका डोळस यांचा अर्ज वैध

0

जिल्हाधिकार्‍यांपुढे झाली सुनावणी; आ. कांबळेंना धक्का

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा नियोजन समिती निवडणूक 2017 ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून लहान नागरी निर्वाचन क्षेत्रातील अनुसूचित जाती या मतदार संघातून सौ. चंद्रकलाताई भाऊसाहेब डोळस, सौ. प्रणिती दीपक चव्हाण, संतोष भाऊसाहेब कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु निवडणूूक निर्णय अधिकारी यांनी सौ. चंद्रकला डोळस व प्रणिती चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा नियोजन समिती निवडणूक नियम 16 (3) (अ) अन्वये अवैध ठरविल्याने संतोष भाऊसाहेब कांबळे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता.

परंतु जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार जयंतराव ससाणे गटाच्या व काँग्रेसच्या नगरसेविका सौ. चंद्रकला भाऊसाहेब डोळस यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या निर्णयाला जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्यासमोर अपिल क्र. 1/2017 दाखल करून आव्हान दिले होते. सदर अपिलाबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी अपिलार्थी सौ. डोळस यांचे विधिज्ञ व निवडणूक निर्णय अधिकारी यांचा युक्तीवाद ऐकून सौ. डोळस यांच्यावतीने केलेल्या युक्तीवादात कलम 16 (3) (अ) हे लागू होत नसून सौ. डोळस यांनी कलम 16 (3) ची पूर्तता केलेली असल्याने सौ. डोळस यांनी सादर केलेले नामनिर्देशन अर्ज वैध घोषित करून त्यांना निवडणूक लढविण्यास पात्र ठरवावे असे म्हटले.

सदरचा युक्तीवाद मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर यांंनी मान्य करत सौ. डोळस यांचा अर्ज वैध ठरवत निवडणूक निर्णय अधिकारी यांना सौ. डोळस यांचे नामनिर्देशन स्वीकृत करून घेण्याचे आदेश दिले. सदरचा युक्तीवाद चालू असताना संतोष भाऊसाहेब कांबळे यांनी आपण बिनविरोध निवडून आल्याचे जनतेस भासवत सत्कार समारंभ स्वीकारण्याचे काम जोरात सुरू केले. परंतु मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी सौ. डोळस यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविल्याने आमदार कांबळे यांना जोरदार राजकीय धक्का बसला असून त्यांना आता निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. सौ. डोळस यांच्यावतीने उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. राहुल कर्पे, अ‍ॅड. सादिक शिलेदार यांनी कामकाज पाहिले.

 

LEAVE A REPLY

*