शिक्षणाचे किती कौतुक करावे?

0

इंजिनिअरिंग शिक्षणाचे पेपर घरी सोडवण्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी २६ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय एक नगरपिते, एक प्राचार्य आणि काही अध्यापक यांना अटक झाली आहे. नगरसेवक सीताराम सुरे यांच्या राहत्या घरी हे विद्यार्थी पेपर सोडवत होते. सर्व विद्यार्थी बी. ई. सिव्हील द्वितीय वर्षाचे असून ते चौका येथील साई इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. या घटनेने शिक्षण क्षेत्रातील खेळखंडोब्यावर पुन्हा एकदा झगझगीत प्रकाश टाकला आहे. शिक्षण क्षेत्राचा पुरता बाजा वाजण्याला केवळ सरकारी धोरणेच कारण ठरत आहेत असे नव्हे;

तर या दुरवस्थेला सरकारमध्ये सहभागी असणार्‍या पक्षांसहित सर्वपक्षीय राजकारण्यांची सक्रिय साथ आहे हे कोण नाकारणार? शिक्षण क्षेत्रात शिक्षणतज्ञांपेक्षा राजकारण्यांचा, पुढार्‍यांचा आणि संबंधित तथाकथितांचा जास्त बोलबाला आहे. बहुतेक शिक्षण संस्था राजकारण्यांच्या कब्जात आहेत. किंबहुना पुढार्‍यांचेच शिक्षणाच्या बाजारात वर्चस्व आहे. स्वार्थी राजकारणामुळे शिक्षण क्षेत्र पुरते नासवून टाकले आहे. टिळक, आगरकर, महात्मा फुले, कर्मवीर पाटील, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे अशा नि:स्पृह समाजहितैषींनी महाराष्ट्राचे नाव शिक्षण क्षेत्रातही उज्ज्वल केले.

आज मात्र ते सर्व महात्मे तसबिरीत टांगले गेले आहेत किंवा पुतळ्यात बंदिस्त आहेत. शिक्षण क्षेत्राच्या अवनतीला पालक, शिक्षक व विद्यार्थी या घटकांनीही जमेल तसा हातभार लावला आहे. पालकांच्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांना पेलावे लागते. वाढत्या स्पर्धेच्या ताणतणावाला सामोरे जावे लागते आणि इतर सर्व संबंधितांना सरकारी तिजोर्‍यांना भगदाडे पाडून आपापले उखळ पांढरे करून घेण्याची चटक लागली आहे.

यशासाठी जवळचे मार्ग (शॉर्टकट) वापरण्याचा मोह विद्यार्थ्यांना होतो व तसे मार्ग उपलब्ध करून देण्याची चढाओढ सर्वच संबंधितांनी आरंभली आहे. परीक्षेचे नाटक पुरे करून येनकेन प्रकारे उत्तीर्ण होणारे विद्यार्थी देशविकासाच्या कामात किती आणि कसा हातभार लावत आहेत याची यादी नव्याने वाचण्याची गरज नाही. स्वार्थी राजकारण, बोगस शिक्षणसंस्था, विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे लादणारे पालक यामुळे दर्जेदार शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे.

सव्वाशे कोटी भारतीयांकडून जागतिक महासत्ता बनण्याची पंतप्रधानांची अपेक्षा कधी आणि कशी पूर्ण होणार? जगभरात संगणक क्षेत्रावर हुशार तरुण भारतीय अधिराज्य गाजवत असले तरीही आपल्याच देशात मात्र पायाखाली काय जळत आहे याचे सखोल चिंतन करण्याची गरज केंद्रातील व राज्या-राज्यातील शिक्षणमंत्र्यांना कधीतरी वाटेल का?

LEAVE A REPLY

*