लोकप्रतिनिधींचे काय चुकले?

0
उद्योजकांची संघटना ‘निमा’तर्फे मुंबईत ‘मेक इन नाशिक’ उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. नाशिकमध्ये नवीन औद्योगिक गुंतवणूक यावी व रोजगारनिर्मितीच्या संधी वाढाव्यात या उद्देशाने हे आयोजन होणार आहे. या उपक्रमाला राजकीय पाठबळ मिळावे यासाठी मनपात लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती; पण या बैठकीकडे फिरकण्याची सवड ११० नगरसेवक व १७ आमदारांना मिळाली नाही.

लोकप्रतिनिधींच्या अनास्थेबद्दल उपस्थितांत चर्चा रंगली होती व ती चर्चा अनाठायी वाटते. विविध उपक्रम आयोजित करणार्‍या संस्था नाशिक शहरात भरपूर आहेत. सगळ्यांनाच आपापले उपक्रम महत्त्वाचे वाटतात. तसे ते लोकप्रतिनिधींनाही वाटावेत, अशी अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? लोकप्रतिनिधी म्हटले की अनेक जबाबदार्‍यांचे ओझे त्यांच्यावर असते.

सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा ते कसे पूर्ण करणार? लोकप्रतिनिधी झाले तरी ती माणसेच ना? त्यांचे प्राधान्यक्रम सामान्यांसारखे कसे असतील? तथापि त्यांनी काही केले वा न केले तरी त्यांना टीकेचे धनी व्हावेच लागते. नुकताच कुणा जगप्रसिद्ध डॉनच्या नातेवाईकाचा लग्नसोहळा नाशिकमध्ये झाला.

त्याला काही लोकप्रतिनिधी हजर होते. त्याचीही शहरात चर्चा चालूच आहे. सामान्य जनता आणि डॉनचे नातेवाईक यात लोकप्रतिनिधींना फरक करावा लागला. त्यात त्यांचे काय चुकले? सगळी सामान्य जनता विरोधात असेल; पण एक डॉन अनुकूल असेल तर निवडणुकीचे भवितव्य सुरक्षित होते ही वस्तुस्थिती नाकारता येईल का? शिवाय अशा कार्यात डॉनच्या अनेक मातब्बर मित्रांच्या भेटीगाठी होतात.

तसे काही ‘निमा’ने बोलावलेल्या बैठकीत शक्य तरी आहे का? ‘निमा’चे बहुतेक सभासद म्हणजे उद्योजक व व्यापारी! लोकप्रतिनिधींना त्यांचा उपयोग फक्त खंडणी व नजराण्यासाठी! ते कितीही रागावले तरी एखाद्या डॉनच्या बोटाच्या इशार्‍यावर त्यांचा राग थंडावू शकतो. मिळायचे ते सहकार्य ते टाळू शकत नाहीत. ‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमाने शहराला कदाचित फायदा होईल. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल.

श्रेय लोकप्रतिनिधींना हमखास मिळणारच! मग ‘निमा’सारख्या संघटनेने आयोजित केलेल्या बैठकीला लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले वा न राहिले तरी काय फरक पडतो? भारतीय मतदार इतका साधा सरळ प्राणी आहे की कोणाला व का निवडून द्यावे याचा विचार करण्याची गरजच त्याला भासत नाही. तोपर्यंत हमखास निवडून येण्याचे काही यशस्वी मार्ग अवलंबावेच लागतात. ‘निमा’च्या आयोजनाला उपस्थिती हा निवडणुकीतील हमखास यशाचा मार्ग म्हणता येईल का? मग नगरपिते व आमदारांनी महापालिकेतील बैठकीकडे पाठ फिरवली यात त्यांचे काय चुकले?

LEAVE A REPLY

*