माध्यमांचा समाजविघातक प्रभाव

0

मराठी चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ‘फेसबुक’ माध्यमावर मनोगत जाहीर करून आपली अस्वस्थता प्रकट केली होती. तापकीर यांच्या मनात त्या क्षणी नेमके काय सुरू आहे, याची चाहूल लागल्यावर एका जरी मित्राने त्यांची भेट घेऊन त्यांना समजावले असते तर तो आत्मनाशाचा क्षण टळला असता, असे मत काही मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

तापकीर यांचे निराश आत्मकथन आवडल्याचे मत अनेकांनी ते न वाचताच नोंदवले होते. ‘व्हॉट्सॅप’चे वेड इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त आहे. दिवसाला पाच कोटी मिनिटे भारतीयांकडून व्हॉट्सॅपच्या सचित्र संवादाला (व्हिडीओ कॉलिंग) खर्च केले जातात, अशी आकडेवारी व्हॉट्सॅप व्यवस्थापनाने प्रसिद्ध केली आहे. समाज माध्यमांच्या फायद्यांची चर्चा करता-करता त्याचे सामाजिक व्यसनात रूपांतर कधी होते हे बहुतेक वापरकर्त्यांच्या लक्षात येत नसावे.

अशा अतिरेकी वापरामुळे आपापल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होत जाते. समाजात मिसळून प्रत्यक्ष संवाद राखण्याची क्षमता कमी होते. सतत मनाने आंतर्जालात गुंतून राहण्याची अनिष्ट सवय तरुणांना व बालकांनासुद्धा जडली आहे. निद्रानाश, सततची बेचैनी असे गंभीर दुष्परिणाम तरुण पिढीवर दिसत आहेत. तरीही हे वेड वाढतच चालले असल्याचे व्हॉट्सॅॅपने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून सिद्ध होते.

तापकीर चित्रपट निर्माते होते म्हणून त्यांच्या आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटनेची चर्चा तरी झडली. ‘एका तरी मित्राने तापकीर यांना भेटायला हवे होते’ ही अपेक्षा चुकीची तरी कशी म्हणावी? मानसोपचारतज्ज्ञांची अपेक्षा रास्तच म्हणावी लागेल; पण रोज पाच कोटी मिनिटे सचित्र संवादावर खर्च करणार्‍या माणसांना तेवढा वेळ कसा मिळणार? माध्यमांच्या अतिरेकी वापराने बधिरलेल्या मनांना इतरांचा विचार तरी कसा सुचणार?

मग प्रत्यक्ष भेटीगाठी व संकटात मदत करण्याची अपेक्षा बधिरलेल्या समाजाकडून करता येईल का? ‘पसंत-नापसंत’च्या (लाईक-डिसलाईक) या आभासी जगात शहाणपण, तर्कसंगती व शहानिशा करण्याची वृत्ती संपुष्टात येत आहे, याबद्दल जाणकार मंडळीसुद्धा चिंता व्यक्त करत आहेत.

तथापि एकदा आभासी जगाची गुलामी पत्करल्यावर त्याचे कितीही गुणगान गायले तरी त्याच्या दुष्परिणामांपासून कशी सुटका होणार? एखाद्या तापकिरासारख्यांच्या आत्महत्येने त्या दुष्परिणामांचा प्रभाव जाणवला तरी त्याचे स्वरूप त्या वेळेपुरते तात्कालीकच राहणार आणि दिवसेंदिवस अशा दुर्घटनांची दखल न घेण्याइतपत माणसे एकमेकांपासून दुरावतील का, हे भविष्यातील मोठे प्रश्‍नचिन्ह ठरू शकते.

LEAVE A REPLY

*