अधिकार्‍यांचा नाकर्तेपणा?

0
कर्नाटक राज्यातील एका सनदी (आयएएस) अधिकार्‍याचा लखनौमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. ते अधिकारी कर्नाटकातील एका मोठ्या घोटाळ्याची पोलखोल करणार होते, असा आरोप उत्तर प्रदेश सरकारच्या एका मंत्र्याने केला आहे. दोन वर्षांपूर्वी कर्नाटकमधीलच सनदी अधिकारी डी. के. रवी यांच्या हत्येचे प्रकरण गाजले होते.

महाराष्ट्रातील अधिकार्‍यांमध्येही बदल्यांमधील धरसोडवृत्तीमुळे भयंकर अस्वस्थता आहे. कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागत आहे. बदलीच्या गावी रुजू व्हायच्या आधीच आणखी बदलीचे आदेश अधिकार्‍यांच्या हातात पडतात. शासनात काम न करणार्‍या अधिकार्‍यांनाच मनपसंत बदल्या आणि बढत्या का मिळतात? शासनदरबारी एकतर निर्णय घेतले जात नाहीत.

जे निर्णय घेतले गेले त्याची अंमलबजावणी होत नाही. कित्येक शासकीय कार्यालयांमध्ये शासनबाह्य घटकांची सत्ता जास्त का चालत असावी? पुण्यातील मुद्रांक शुल्क कार्यालयात वर्षानुवर्षे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. तशी ती प्रलंबित ठेवण्यात कार्यालयातील कोणी काळे की गोरे घटकांनाच अधिक रस असल्याची चर्चा आहे.

अनेक अधिकारीही वर्षानुवर्षे ‘मागील पानावरून पुढे’ असा कारभार कोणाच्या वरदहस्तामुळे हाकत असावेत? कधी तांत्रिक कारणांचा आधार घेत तर कधी कागदपत्रांच्या अपूर्ततेचे कारण सांगून जनतेची कामे का टाळली जातात? जनतेची कामे करायची नाहीत आणि करू द्यायची नाहीत असेच धोरण वरिष्ठांनीसुद्धा स्वीकारले असावे का?

अधिकारी निर्णय घेत नाहीत. परिणामी त्यांच्या कनिष्ठ सहकार्‍यांना काय करावे तेच कळेनासे होत असेल तर त्यात आश्यर्च तरी काय मानावे? अधिकार्‍यांच्या या ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिकेचे गंभीर परिणाम फक्त अगतिक जनतेला सहन करावे लागत आहेत. ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशी जनतेची अवस्था आहे.

एखाद्या किरकोळ प्रमाणपत्रासाठी महिनोन् महिने किंवा वर्षानुवर्षे सरकारी कचेर्‍यांचे उंबरठे झिजवण्याची वेळ गरजू जनतेवर लादली जात आहे. परिणामी अनेक शासकीय कार्यालयांत शासकीय सेवक आणि सामान्य नागरिकांमध्ये ‘तू-तू-मैं-मैं’चे प्रसंग वारंवार उद्भवू लागले आहेत.

अनेक घटनांमध्ये जनतेने रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली आहे. जनतेच्या मनातील आक्रोश शासनाच्या लक्षात येईल का? जनतेच्या मनातील संताप वाढून त्या भावनेचा उद्रेक झाल्यास त्याची जबाबदारी अधिकारी घेतील का? जे कामेही जबाबदारीने करू शकत नाहीत त्यांच्यापुरता तोही एक उपचारच!

LEAVE A REPLY

*