शंकासुरांना आव्हान

0
देशात अलीकडेच झालेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली मतदान यंत्रांत (इव्हीएम) फेरफार केला गेल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. आम आदमी पक्ष या आक्षेपावर आजही ठाम आहे. विरोधी पक्षांच्या आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीतील पारदर्शकतेबद्दल संशय निर्माण झाला आहे.

मतदान यंत्रांशी छेडछाड अथवा फेरफार करता येणे शक्य नाही, असा ठाम दावा निवडणूक आयोगाने वेळोवेळी केला आहे. तरीही विरोधी पक्षांकडून वारंवार होणार्‍या आरोपांमुळे आयोगाच्या कामकाजाबद्दल जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होणे साहजिक आहे. तो वेळीच दूर व्हावा आणि सर्वच राजकीय पक्षांचे शंका निरसन व्हावे म्हणून ‘मतदान यंत्रात फेरफार करून दाखवाच’ असे जाहीर आव्हान निवडणूक आयोगाने सर्व विरोधी पक्षांना दिले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी परवा पत्रकार परिषद घेऊन मतदान यंत्रांबाबतचे सर्व आरोप खोडून काढले. मतदान यंत्रांबाबत आरोप होत असले तरी अद्याप एकाही पक्षाकडून तसे पुरावे सादर केले गेलेले नाहीत हेही त्यांनी लक्षात आणून दिले. कोणत्याही तज्ञाला सोबत आणून मतदान यंत्रात फेरफार करूनच दाखवावा, असे आव्हान देऊन त्यासाठी येत्या ३ जूनचा मुहूर्त जाहीर केला आहे. मात्र त्यासाठी काही अटीही घातल्या आहेत.

मतदान यंत्रे किती सुरक्षित आहेत, याचेही प्रात्यक्षिक मुख्य निवडणूक आयुक्तांनी दाखवले. निवडणूक आयोगाचे हे आव्हान स्वीकारताना राजकीय पक्षांना २६ मेपर्यंत नावनोंदणी करायची आहे. निवडणूक आयोग राजकीय दबावाखाली काम करत असल्यामुळेच मतदान यंत्र ‘हॅक’ करण्याच्या प्रात्यक्षिकांना उशीर लावला जात असल्याचा नवा आरोप ‘आआपा’ आणि बसपने केला आहे.

आक्षेपाला वाव राहू नये म्हणून यापुढील निवडणुकीत मतदानानंतर मतदारांना पावती मिळण्याची सुविधा केली जाणार आहे. तेरा राजकीय पक्षांनी आयोगाला भेटून मतदान यंत्रांबाबत शंका घेतली आहे. तथापि प्रशासनावरचा जनतेचा विश्‍वास अबाधित राखण्यासाठी निवडणूक आयोगाने उचललेले हे उचित पाऊल आहे. राजकीय पक्ष सोयीनुसार रंग बदलतात. आरोप-प्रत्यारोप करतात. निवडणूक आयोगाचे आव्हान कोण-कोण स्वीकारतात व आक्षेप सिद्ध करतात हे लवकरच समजेल. तसे न झाल्यास राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या बकबकीची हवा निघून जाईल. या रोखठोक आव्हानाबद्दल सव्वाशे कोटी भारतीय आयोगाला नक्कीच धन्यवाद देतील.

LEAVE A REPLY

*