स्त्रियाही दोषी नव्हेत का?

0

स्वत:ला कीर्तनकाराचा मुलगा म्हणवून घेणार्‍या एका भामट्याने आयटी क्षेत्रातील अनेक युवतींना गंडा घातला. आपण परदेशात नोकरीला असल्याचे सांगत तो तरुणींशी जवळीक साधून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असे. विवाह जुळवणी करणार्‍या काही वेबसाईटस्वर त्याने आपली माहिती प्रसिद्ध केली आहे. परदेशात नोकरीस असून आपण गलेलठ्ठ पगार कमावत असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे अनेक विवाहेच्छुक तरुणींनी त्याला ऑनलाईन प्रतिसाद दिला.

त्याच्याशी विवाह करण्याची आतूरता व्यक्त केली. अशा अनेक आतूर उपवर तरुणींनी त्याच्या खात्यावर हजारो रुपये जमा केले. आरोपी तरुणाचा गुन्हा गंभीर आहे आणि दोषीला शासन व्हायलाच हवे; पण या प्रकरणात दोष केवळ तरुणालाच देऊन चालेल का? तरुणींनाही दोषी मानायला हवे की नको? ‘मुलगी शिकली आणि प्रगती झाली’ हे बोधवाक्य सध्या सर्वत्र गाजत आहे.

एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब सुशिक्षित करते, असे म्हटले जाते. शिक्षणच स्त्री उद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे. म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे हे तर थोरामोठ्यांनीही सांगून ठेवले आहे. तथापि शिक्षणाने स्त्रिया किती जागरुक झाल्या? त्यांचा दृष्टिकोन किती बदलला? केवळ लग्न म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता या चाकोरीबद्ध कल्पनेतून किती सुशिक्षित तरुणी बाहेर पडल्या?

एखाद्या वेबसाईटवर वाचलेल्या माहितीची सत्यता पडताळून न बघता सुशिक्षित तरुणीसुद्धा भामट्यांच्या भुरटेगिरीला फशी पडत असतील तर शिक्षणाने त्यांना किती हुशार केले असे मानावे? केवळ तेवढेच नाही तर प्रियकर भेटला नाही म्हणून एखादी संगणक क्षेत्रातील तरुणी आत्महत्या करते. काही प्रेमप्रकरणातील अपयशाने वा फसवणुकीने जीव देते. एवढीच त्यांच्या शिक्षणाची फलश्रुती मानावी का? जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित होत नसेल तर शिक्षणाचा तरी काय उपयोग?

शिक्षित युवतींकडून समाजाने तरी कोणती अपेक्षा करावी? स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडावीत यासाठी सावित्रीबाई फुलेंनी खस्ता खाल्या. शेणाचे गोळे, दगडफेक सहन केली. स्त्री शिक्षणाला आपले आयुष्य अर्पण केले; पण आजच्या शिक्षित स्त्रिया त्यांच्या संकुचित बुद्धीने शिक्षणाला उणेपणा आणत आहेत असे म्हणावे का? जबाबदारीचे भान जागे होत नसेल तर शिक्षणातील उणिवा त्याला जबाबदार आहेत असेच मानावे लागेल. समाजातील भल्याबुर्‍या प्रवृत्ती ओळखण्याची क्षमता अंगी येत नसेल व परंपरागत जोखड झुगारण्याचे तारतम्य प्राप्त होत नसेल तर त्या शिक्षणाला तरी किती अर्थ उरतो?

LEAVE A REPLY

*