Video : पेणचे मूर्तिकार घेतात नाशिकच्या तरुणांकडून प्रशिक्षण

सृष्टी गणेशच्या माध्यमातून पर्यावरणीय गणेशोत्सवाचा जागर

0

नाशिक, ता. १ (प्रसाद जगताप) : पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे पेण हे माहेरघर. पण याच पेणहून काही मूर्तीकार साचा कसा बनवावा याचे प्रशिक्षण घेण्यासाठी नाशिककर मूर्तीकारांकडे येत आहेत.

विशेष म्हणजे हे काही व्यावसायिक मूर्तीकार नसून पर्यावरण पूरक शाडू माती आणि मातीच्या गणेशमूर्तींच्या प्रचार प्रसाराच्या ध्येयातून ते या मूतीकलेकडे वळले आहेत.

जेलरोड येथे सृष्टी गणेश या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेले अमोल कुलकणी आणि प्रशांत बेलगावकर अशी त्या तरुण मूर्तीकारांची नावे.

गेल्या पंधरा वर्षांपासून समाजात मातीच्या गणपतीबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मोफत कार्यशाळेच्या माध्यामतून शाडू मातीचा गणपती तयार करण्याचे मार्गदर्शन देत असतानाच संपर्कात आलेल्या लोकांच्या आग्रहास्तव मागील सहा वर्षांपासून ते घरीच माती आणि शाडू मातीचे गणपती बनवित आहेत.

त्यासाठीच्या अनेक गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. त्यापैकी एक होती प्रभावी साचा. साचा बनविण्यासाठी त्यांनी डेंटल प्लॅस्टरचा वापर केला. त्यांचा हा प्रयोग त्यांच्या संपर्कातील पेणचे मूर्तीकारही या पद्धतीचा अवलंब करू लागले आहेत.

रासायनिक रंगांनी रंगविलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे जलस्त्रोतांचे नुकसान होऊन पर्यावरणाचे नुकसान होते. हे सर्व कमी करण्यासाठी या तरुणांनी एकत्र येऊन स्वत:च्या घरापासून घरी बनविलेल्या मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करायला सुरूवात केली. त्यापुढे जाऊन त्यांनी अशा मूर्तींचे प्रशिक्षणही द्यायला सुरूवात केली.

त्यातूनच स्वत: मूर्ती बनविण्याची संकल्पना पुढे आणली. त्यासाठी त्यांनी सृष्टी गणेश या पर्यावरणपूरक संस्थेची स्थापना केली.

सध्या दरवर्षी विविध आकाराच्या हजार ते बाराशे पर्यावरणपुरक मूर्ती बनवितात. त्यात शाडू माती, धरणांच्या गाळाची माती असे प्रकार असतात. या मूर्तींचे रंगही नैसर्गिक देण्याकडे त्यांचा कल आहे. हळद, कुंकू, आंबेहळद, गेरू असे रंग वापरून बनविलेल्या मूर्ती १०० टक्के पर्यावरणपूरक असल्याचे अमोल आणि प्रशांत सांगतात.

त्यांनी अलिकडेच आणलेली अभिनव संकल्पना म्हणजे अंकूर गणपतीची. मातीपासून निर्मित या गणेशमूर्तीच्या पोटात फळ-फुल भाज्यांचे बी-बियाणे टाकले जाते. घरच्या घरी कुंडीत किंवा बागेत ही मूर्ती विसर्जित केली की वर्षभरातच त्यातून फुल किंवा फळझाड तयार होते. ही गणेशमूर्ती ११० टक्के पर्यावरणपुरक असल्याचे ते सांगतात.

विशेष म्हणजे दोन्ही तरुणापैकी कोणीही मूर्तिकार नाही. पर्यावरण रक्षणाच्या कामातून निर्माण झालेल्या गरजेपोटी हे दोघे मूर्तीकार बनले. त्यातही नफा कमाविण्यापेक्षा पर्यावरण जागृती हे उद्दीष्ट असल्याने बाजारातील शाडू मूर्तींच्या तुलनेत कमी किंमतीत मूर्ती देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या कामात त्यांचे कुटुंबियही त्यांना मदत करतात.

वैयक्तिक जाणिवेतून सुरू झालेला हा उपक्रम आता नाशिक शहरातील पर्यावरणपूरक चळवळच बनली आहे. दरवर्षी शेकडो नाशिककर सृष्टी गणेशाची स्थापना करून पर्यावरण रक्षणाचे काम करत आहेत.

LEAVE A REPLY

*