श्रीरामपूर शहरात पोलिसांची संख्या वाढविणार : शर्मा

0

पोलीस चौकी उभारण्यासाठी निधी देण्याची आ. कांबळे यांची शांतता समितीच्या बैठकीत घोषणा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर हे जेवढे अतिसंवेदनशील आहे त्याहीपेक्षा शांतताप्रिय आहे. या शहरात काही ठिकाणी पूर्वी पोलीस चौकी होत्या. त्या पुन्हा सुरू करण्याची गरज असून त्या लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तसेच पोलिसांची संख्या वाढविण्याबाबतही अभ्यास चालू असून लवकरात लवकर पोलीस संख्याबळ वाढवू असे आश्‍वासन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिले.

श्रीरामपूर येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. भाऊसाहेब कांबळे होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार सुभाष दळवी, पोलीस उपअधीक्षक अरुण जगताप, पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन गुजर, अ‍ॅड. विजयराव बनकर, उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक राजेंद्र पवार, संतोष पवार, शामलिंग शिंदे, वैशाली चव्हाण, प्रकाश ढोकणे, मुख्तार शहा, आदित्य आदिक पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, पोलीस निरीक्षक वसंत पथवे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी केले. यावेळी मनोज नवले, अहमद जहागीरदार, प्रकाश ढोकणे, सरवरअली सय्यद, कुणाल करंडे, सुभाष त्रिभुवन, बाबा शिंदे, अन्तोन, राजेंद्र पवार, सचिन गुजर, दीपक पटारे, अरुण जगताप, रोहिदास पवार यांची भाषणे झाली.

शर्मा म्हणाले, आता सर्व धर्मसमभावाचे उत्सव सण साजरे होत असतात. या उत्सवात भारतीय संस्कृतीचे व परंपरा जोपासण्याचे काम करत असतो. यात काही समाजकंटक असतात. त्यांच्यामुळे गालबोट लागून त्याचे पडसाद वेगळे उमटत असतात. या समाजकंटकांना घालवायचे असल्यास आपल्याला एकत्र येऊनच हे काम करावे लागणार आहे. यासाठी काही ठिकाणी संघटना कार्यरत आहेत. तर शांतता समितीचे लोकही यात सहभाग घेऊन हे कार्य करु शकतात. त्यामुळे नागरिकांनी ठरविले तर नक्कीच कोणतीही घटना न घडता आपल्या सण उत्सवाचा आनंद आपल्याला लुटता येऊ शकतो.

आ. कांबळे म्हणाले, शहरात यापूर्वी चार दिशांना चार पोलीस चौक्या होत्या. कालांतराने त्या बंद पडल्या. आता नगरपालिकेच्या सहकार्याने या चौक्या पुन्हा सुरू करू. त्यासाठी आमदार निधीतूनही निधीची पूर्तता करू. आपण फक्त आम्हाला पोलिसांची संख्या वाढवून द्यावी.

शहरातील वॉर्ड क्रमांक-2 मध्ये पोलीस चौकीची खूपच गरज आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने कर्मचारी द्यावेत.त्या जागेसाठी पालिकेच्या नियमानुसार जे भाडे लागेल ते मी स्वतः देण्यास तयार आहे. परंतु पोलीस चौकी आम्हाला द्यावी. पोलीस चौकी असती तर मागे जी घटना घडली ती घडली नसती.
– अहमद जहागीरदार (नागरिक)

LEAVE A REPLY

*