कामगारांना कामावर हजर होण्याचे लेखी आदेश ; ‘डॉ. तनपुरे’ सुरू करण्यासाठी संचालक मंडळाचे सकारात्मक पाऊल

0

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – डॉ. तनपुरे कारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठण करून जिल्हा बँकेने कारखान्याची मालमत्ता संचालक मंडळाकडे सुपूर्त केल्यानंतर संचालकांच्या पहिल्याच झालेल्या बैठकीत कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने डॉ. सुजय विखे यांनी सकारत्मक पाऊल उचलले असून कारखान्याच्या कायम असणार्‍या कामगारांना 1 ऑगस्ट पासून कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संचालक मंडळाच्या बैठकीत कारखाना सुरू करण्याचे दृष्टीने संाघिक प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. कारखाना ताब्यात येण्यास उशिर झाला असला तरी सर्वोतोपरी प्रयत्नातून गळीत हंगाम योग्य वेळेस सुरू करण्याचा मानस यावेळी सर्वांनी व्यक्त केला. कारखाना मशिनरी दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे दृष्टीने कायम कामगारांना कामावर हजर करण्यात येणार आहेत.

कारखानाचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी प्रथम सभासदांची थकित रक्कम सुमारे साडे बारा कोटी रूपये व कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची साडे पाच कोटी रूपये ही रक्कम भरणे बंधनकारक आहे. याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत काय चर्चा झाली? याची मात्र माहीती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु या थकित देण्याबाबत कामगार व सभासदांना विश्‍वासात घेऊन थकित रक्कम गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर मिळाली तरी चालेल. गळीत हंगाम सुरू करण्यास आमची हरकत नाही. अशा आशयाचे संमतीपत्र लिहून घेऊन तुर्त मार्ग काढण्याचा मानस या बैठकीत चर्चिला गेल्याची माहीती समजली आहे.

कामगारांना कामावर हजर होण्यासाठी कार्यकारी संचालक यांच्या स्वाक्षरीने कारखाना मुख्य प्रवेशद्वारावर लेखी आदेश डकविण्यात आला आहे. कामावर हजर होण्याचा आनंद असलातरी आपल्या थकित देण्याबाबत काय? हा विचार डोक्यात कायम आहे. दरम्यान कारखाना सुरू होणार या भावनेतून तालुक्यात विशेषतः कारखाना परिसरातील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आपल्या व्यावसायाला पुन्हा ‘अच्छे दिन’ येणाची आशा वाढू लागली आहे.

 सुजय विखे यांची हत्तीवरुन मिरवणूक काढून साखर वाटणार –  कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे डॉ.सुजय विखे यांच्यामुळे कारखान्याचे कामगारांच्या गार पडलेल्या चुल्ही पुन्हा पेटणार आहेत.कामगारांच्या कुटुंबाची झालेली वाताहात पुन्हा सावरली जाणार आहे.कारखाना सुरु होऊन निर्माण होणारे पहिले साखर पोत्याची साखर डॉ.सुजय विखे यांची हत्तीवरुन मिरवणूक काढून राहुरी शहारात वाटण्याचा कामगारांचा मानस असल्याचे कामगार कृती समितीचे सुरेश थोरात यांनी म्हटले आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीबाबत अध्यक्ष उद्यसिंह पाटील यांना विचारले असता काही विशेष चर्चा झाली नाही, रूटिन बोर्ड मिटींग होती त्यामुळे काही विशेष नसल्याचे त्यांनी सांगितले. तर या बैठकीपाठोपाठ राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या पदाधिकार्‍यांची बैठक होऊन त्यामध्ये संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. कामगारांना कामावर हजर करून घेण्याचा दिवस हा कामगारांच्या दृष्टीने सोन्याचा दिवस असून या निर्णयामुळे कामगार आनंदी आहेत.

LEAVE A REPLY

*