विखे पाटील कारखाना यंदाही उच्चांकी गाळप पूर्ण करणार : डॉ. सुजय विखे

0

 कारखान्यात रोलरमिलचे पूजन

लोणी (प्रतिनिधी) – सरकारच्या सातत्याने बदलणार्‍या निकषांचा सहकारी साखर कारखानदारीवर मोठा परिणाम होत असून, निर्माण होणारी आव्हाने ही मोठी असली तरी, या आव्हानांना सामोरे जात आपण कारखान्याची वाटचाल यशस्वी केली आहे. यंदाही संचालक, आधिकारी आणि कामगार यांच्यातील सुसंवादातून उच्चांकी गाळप पूर्ण करू असा विश्वास विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

डॉ. विखे पाटील कारखान्यात शनिवारी रोलर पूजन डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव लाटे पाटील, यांच्यासह सर्व संचालक यावेळी उपस्थित होते. डॉ. विखे म्हणाले, यावर्षी पाऊस चांगला झाल्याने धरणं भरली आहेत. उसाचे यावर्षी आणि पुढील वर्षी देखील चांगले गाळप करण्याचे नियोजन करावे लागेल. सर्वच कारखान्यांपुढे विविध प्रश्नांची मालिका उभी आहे.

एक आव्हान समजून आपण यावर्षीचा हंगाम यशस्वी करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले व्यवस्थापन, संचालक, आधिकारी आणि कामगार यांच्यातील योग्य सुसंवाद राहील्याने यापुर्वीच्या आलेल्या संकटातूनही आपण यशस्वी मार्ग काढले. गणेश आणि राहुरी हे दोन्हीही कारखाने आपल्या बरोबरीनेच चालवावे लागणार आहेत.

गणेश कारखान्याच्या गाळपाचे उद्दिष्ट मागील प्रमाणेच पूर्ण होईल. परंतु राहुरी कारखान्याच्या बाबतीत आव्हान असले तरी, तो कारखाना सुरु व्हावा ही पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची इच्छा होती. त्यामुळे राहुरी कारखान्याच्या संदर्भातील सर्व प्रश्नांवर मार्ग काढत हा कारखाना यावर्षी सुरु व्हावा यासाठी कर्जाचे पुनर्गठन करण्याचा पाठपुरावा यशस्वी झाल्यामुळे हा कारखाना सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कारखान्याचा कोणताही आर्थिक भार डॉ. विखे पाटील कारखान्यावर पडणार नसल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांनी केले. या कार्यक्रमास सर्व विभागांचे आधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*