जिल्हा शल्यचिकित्सकाच्या निर्देशनानुसार पोलीस कारवाई

0

बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये प्रसुतीपुर्वीच विवाहितेचा मृत्यू

मनपाकडून नातेवाईकांना 1 लाखाची मदत

अहमदनगर (प्रतिनिधी) – मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात प्रसृतीसाठी दाखल केलेल्या श्रावणी रवी निकम या महिलेचे रविवारी सकाळी प्रसृतीपूर्व निधन झाले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप श्रावणीच्या नातेवाईकांनी केला असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात संबंधीत डॉक्टरांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.

दरम्यान, घडलेली घटना दुदैवी असून मनपाकडून श्रावणीच्या नातेवाईकांना एक लाख रुपयांची मदत देणे शक्य होईल, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. घाटी रुग्णालयातील पोस्टमार्टम तसेच देशपांडे रुग्णालयातील उपचाराचा अहवाल एकत्रितपणे जिल्हा शल्य चिकित्सकांकडे दिला जाणार असून त्यांच्या निर्देशानुसार पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चार दिवसांपूर्वी श्रावणीला प्रसृतीसाठी मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री तिला त्रास होत असतांना त्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप श्रावणीच्या नातेवाईकांनी केला. तसेच रविवारी सकाळी तिला त्रास होत असताना वेळेवर उपचार मिळाले नाही. यामुळे श्रावणीचा प्रसृतीपूर्व मृत्यू झाला. यात श्रावणीच्या पोटातील बाळही मृत झाले.

याप्रकरणी सुलभा साटाणकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात रुग्णालयातील डॉक्टर ठोकळ यांच्या विरोधात कलम 304 गुन्हा नोंदवण्यात आला होता. रविवारी डॉ. ठोकळ यांना ताब्यात घेवून त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना सोडून देण्यात आले असल्याचे कोतवाली पोलीसांनी सांगितले.

दरम्यान, श्रावणीचे मृतदेह औरंगाबादला घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. हा अहवाल आल्यानंतर त्याची प्रत आणि श्रावणीवर उपचार सुरू असताना तयार केलेले कागदपत्र आणि देशापांडे रुग्णालयाचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या समितीकडे पोलीसामार्फत पाठवण्यात येणार आहे. ते या अहवालाची तपासणी करून पुढील कारवाई करण्याचे निदर्शे पोलिसांना देणार आहेत. त्यानुसार पोलीस कारवाई करतील.

सोमवारी सकाळी एक शिष्टमंडळ मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांच्याकडे गेले होते. मनपाच्या बजेटमध्ये अशा घटनामध्ये सहानुभूती म्हणून भरपाई देण्यासाठी तरतूद करण्यात आली असून श्रावणीच्या वारसास 1 लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळू शकते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*