जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतला निवडणुकीचा आढावा

0
नेवासा (ता. प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अभय महाजन तसेच जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी नेवासा नगर पंचायतीच्या निवडणुकीचा आढावा घेतला.
निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखली जाण्याच्या दृष्टीने सर्व पक्षांच्या उमेदवारांची बैठक घेऊन सर्वांना त्यांनी शांततेचे आवाहन केले. या बैठकी दरम्यान उमेदवारांनी विविध प्रश्न विचारले.
निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, अशी सूचना पत्रकारांनी मांडली. यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी म्हणाले, की निवडणूक निश्चितच भयमुक्त वातावरणात पार पडेल. तसेच शहरातील शस्त्रे ताब्यात घेतली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 47 लोकांना पोलिसांमार्फत नोटिसा बजावल्या आहेत. तर 24 गुन्हेगारांना शहराबाहेर जाण्यास सांगितले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी वामनराव कदम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश गांगोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप भोळे, नेवासा-शेवगावचे उपजिल्हा पोलीस प्रमुख शिवतारे या बैठकीला उपस्थित होते.
जातीय मुद्द्यावर मते मागितली जाऊ नयेत, अशी सूचना काँग्रेसच्या उमेदवार शालिनी सुखदान यांच्यावतीने संजय सुखदान यांनी केली.
रितसर परवानगी
शहरात क्रांतिकारी पक्षाने लावलेल्या आकर्षक फ्लेक्सबद्दल शंका उपस्थित करण्यात आली. त्यावर सदर जागेची रितसर परवानगी काढण्यात आली असून त्याकरिता ठरवून दिलेली रक्कम भरून घेण्यात आली असल्याचा खुलासा निवडणूक अधिकारी वामनराव कदम यांनी केला.

LEAVE A REPLY

*