जिल्हाधिकार्‍यांच्या वाहनावर पुन्हा दिवा

आंदोलनाची धास्ती, केंद्राच्या आदेशाचे उल्लंघन

0
नाशिक | दि. ६ प्रतिनिधी – व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने मंत्री आणि अधिकार्‍यांच्या वाहनांवरील दिवा वापरण्यास बंदी घातली. काही मोजक्याच व्यक्तींना दिवा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांनी खुद्द केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करत आपल्या वाहनावर अंबर दिवा बसवला आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या धास्तीने आपले वाहन अडवू नये याकरिता हा दिवा बसवला असल्याचे बोलले जात आहे.

वाहनावरील लाल अंबर दिवा म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. मात्र आता प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असे धोरण स्वीकारत केंद्र सरकारने व्हीआयपी संस्कृतीला चाप लावला. वाहनांवरील लाल आणि अंबर दिवा काढून टाकल्यामुळे अधिकारी आणि मंत्र्यांची वाहने ही सर्वसामान्य नागरिकांकडे असलेल्या वाहनांमधील वाहन असल्यासारखे वाटत आहे.
मात्र नाशिक जिल्हाधिकार्‍यांनी मात्र सरकारच्याच आदेशाचे उल्लंघन करत आपल्या वाहनावरील अंबर दिवा पुन्हा बसवला. नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात सध्या शेतकरी आंदोलनाची धग पेटली आहे.  या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे. त्यातच जिल्हाधिकार्‍यांच्या वाहनांवर दिवा नसल्यामुळे जिल्ह्यात परिस्थितीची पाहणी करत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दिव्याचा रुबाब आंदोलन काळात महत्त्वाचा असल्याने या आंदोलनाची धास्ती घेऊन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आपल्या वाहनावर पुन्हा अंबर दिवा लावला आहे.  जिल्हाधिकार्‍यांनी वाहनावर दिवा बसवण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली असता असे सांगण्यात आले की जिल्ह्यात सुरू असलेले शेतकरी संपाचे आंदोलन आणि या आंदोलनाने घेतलेले हिंसक वळण यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्यामुळे वाहनावर दिवा बसवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.

मंत्री विनादिवा
जिल्ह्याचे पालकमंत्री आंदोलन काळातही विनादिव्याचा वापर करत शहरात संचार करत होते. तर आज एक केंद्रीय मंत्रीही कोणताही डामडौल सोबत न घेता अत्यंत साध्या पद्धतीने विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होते. नाशिक जिल्हाधिकार्‍यांनी मात्र शाासनाच्याच आदेशाचे उल्लंघन करत आपल्या वाहनावर दिवा बसवला हे विशेष!

LEAVE A REPLY

*