जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाची निवड 8 मार्चला

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदाची निवड प्रक्रिया येत्या बुधवारी (दि. 8 मार्च) होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची निवड सहकार निवडणूक प्राधिकरणाने केली आहे. दरम्यान, अचानक चेअरमन पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुसरीकडे कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार हे निवांत झाले असून यामुळे गुरूवारी रात्रीच इच्छुक मुंबई-पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

जिल्हा बँकेचे तत्कालीन चेअरमन उदय शेळके यांच्या निधनानंतर नवीन चेअरमन निवडीसाठी कार्यक्रम लावण्याची मागणी ठरावाव्दारे फेबु्रवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संचालक मंडळाने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे केली होती. ही मागणी केल्यानंतर साधारण महिनाभरात अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल, इच्छुकांना वाटत होते. मात्र, सहकार निवडणूक प्राधिकरणाने दोन दिवसांपूर्वी चेअरमन पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक पुरी यांची नेमणूक केली आहे. येत्या 8 मार्चला पुरी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा बोलवण्यात आली असून यात चेअरमन पदासाठी गरज पडल्यास निवडणूक होईल, अथवा नेत्यांच्या आदेशाने ही निवड बिनविरोध होईल.

जिल्हा बँकेत सर्वपक्षीय सत्ता असली बँकेच्या राजकारणात अंतिम निर्णय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार हे घेत असतात. बँकेत सध्या चेअरमन पद हे राष्ट्रवादीच्या कोट्यात असून व्हाईस चेअरमन पद हे काँग्रेसकडे आहे. यामुळे आता चेअरमन पदावर राष्ट्रवादीच्या संचालकांपैकी एका संचालकांना संधी मिळणार आहे. साडे आठ हजार कोटींच्या ठेवी असणार्‍या जिल्हा बँकेवर चेअरमन होण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येक संचालकांची आशा आहे. मात्र, नेते ऐनवेळी कोणाच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ घालणार, कोण ऐनवळी लॉबिंग करण्यात यशस्वी ठरणार आहे. हे बुधवार (दि.8) सायंकाळी कळणार आहे.

संचालकांचे दबाव तंत्र

जिल्हा बँकेच्या 20 संचालकांपैकी काही संचालक एकत्र येण्यास सुरूवात झाली आहे. उत्तर आणि दक्षिणेतील तालुक्यातील अशा प्रकारे पाच संचालक एकत्र येणार असून चेअरमन पदाच्या निवडीत त्यांच्यापैकी एकाला ही संधी न दिल्यास ते दबाव तंत्राचा वापर करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी बंडाचे निशाण फडकवल्यास त्याचा मोठा परिणाम जिल्हा बँकेच्या वर्तुळात होणार आहे. यामुळे हा उठाव रोखण्यासाठी आ. पवार आणि आ.थोरात काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

विखे पिता-पुत्र बँकेत लक्ष घालणार?

जिल्हा बँकेच्या राजकारणापासून लांब असणारे मात्र राज्यात शिंदे-फडणवीस यांची सत्ता आल्यानंतर नगर जिल्ह्याच्या राजकारणात कमालीचे सक्रिय झालेले पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हा बँकेच्या राजकारणात रस दाखवणार का? चेअरमन पदाच्या स्पर्धेत कोणाला पाठिंबा देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *