रिझर्व बँक जिल्हा बँकांमधील जुन्या नोटा स्वीकारणार!

0

नगर जिल्हा बँकेच्या 162 कोटी 99 लाखांच्या नोटा बदलून मिळण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये पडून असलेल्या जुन्या 500, 1000 च्या नोटा रिझर्व बँक ऑफ इंडिया स्वीकारणार आहे. अर्थ मंत्रायलाने याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे.
8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर 10 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या पाच दिवसांत जिल्हा बँकांमध्ये, तर 30 डिसेंबर 2016 पर्यंत टपाल कार्यालय आणि अन्य बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटा रिझर्व बँकेच्या कोणत्याही कार्यालयात स्वीकारल्या जातील, असं अर्थमंत्रालयाने म्हटलं आहे.
अर्थात, या नोटा आधी का जमा केल्या नाहीत, याचा खुलासा त्यांना करावा लागणार आहे.
नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटा स्वीकारण्यास पहिल्या पाच दिवसांनंतर बंदी घालण्यात आली. 10 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या पाच दिवसांतच जिल्हा बँकांमध्ये नोटा स्वीकारण्यात आल्या. मात्र नोटाबदली करून देताना गैरप्रकार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर रिझवर्र् बँकेने जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली.
रिझर्व बँकेत जुन्या नोटा जमा केल्यानंतर नव्या स्वरूपातील रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात जमा केली जाईल, असं अर्थमंत्रालयाने म्हटलं आहे. नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर पुढचे 30 दिवस ही रक्कम रिझर्व बँकेत जमा करता येणार आहे.
नोटाबंदीनंतर देशातल्या 371 जिल्हा बँकांत चार दिवसांत 44 हजार कोटींची रक्कम जमा झाली. एकट्या महाराष्ट्रात 31 जिल्हा बँकांत 4600 कोटी रुपये जमा झाले होते. यात जुन्या चलनातली रक्कम देशात आठ हजार कोटी तर राज्यात 2772 कोटी रुपये एवढी होती.

व्याजाच्या भुर्दंडाचे काय?
नगर जिल्हा बँकेत 8 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2016 या कालावधीत 162 कोटी 99 लाख रुपयांच्या 500 व 100 रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. त्या सरकारने न स्वीकारल्याने त्या तशाच पडून आहेत. तसेच व्याजाचा भुर्दंडही पडत होता. पण आता या निर्णयाने नोटा बदलून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र व्याजाच्या भुर्दंडाबाबत रिझर्व बँक अथवा सरकारकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. 

बँका, पोस्ट, शेतकर्‍यांना दिलासा बँका, पोस्ट, शेतकर्‍यांना दिलासा  रिझर्व बँकेने नाबार्डच्या माध्यमातून तिसर्‍यांदा तपासणी केली. त्यामध्ये राज्यातील बहुतांशी जिल्हा बँकांची 100 टक्के केवायसी पूर्तता झालेले निदर्शनास आले. त्यामुळे नोटा स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण तपासणी करून महिना उलटला तरी अद्याप नोटा स्वीकारण्यास काहीच हालचाली दिसत नसल्याने जिल्हा बँकांचे प्रशासन हवालदिल झाले आहे. कोट्यवधींच्या नोटा सहा महिने पडून असल्याने लाखो रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड बँकांना बसला आहे. जिल्हा बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पीककर्ज, 10 हजारांपर्यंतची उचल देणंही बँकांना कठीण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँका आणि शेतकर्‍यांना हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे. पोस्ट खात्यातील नोटाही स्वीकारणार असल्याने त्यांचीही डोकेदुखी कमी होणार आहे. 

LEAVE A REPLY

*