जिल्हा बँकांत तीन हजार कोटींच्या जुन्या नोटा पडून

0

रिझर्व्ह बँक, केंद्राचा कोणताही निर्णय नाही; शेतकर्‍यांची कर्जासाठी ओरड

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा सहकारी बँकांच्या सध्या अस्तित्वा चा प्रश्न निर्माण झाला आहे. 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा स्विकारण्याची अंतिम तारीख 31 मार्चला संपल्यानंतर या बँकामंध्ये जमा झालेल्या पैशाचं करायचे काय असा प्रश्‍न आता बँकांसमोर उभा ठाकला आाहे.

जिल्हा बँकामध्ये सुमारे 3000 कोटी रूपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. त्यामुळे राज्यातील 33 पैकी 27 जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आल्या आहेत. नाशिक, अहमदनगर, बीडल, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी ठिकाणच्या बँकांमध्ये पैशांची टंचाई निर्माण झाली आहे.
तसेच जून महिन्यात पावसाला सुरूवात होईल. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीसाठी या बँकाकडून कर्ज घ्यावे लागते. मात्र, कर्जाची मागणी करूनही बँकात पैसाच उपलब्ध नसल्याने तसेच जुन्या नोटा पडून असल्याने कर्ज पुरवठा करायचा कसा असा यक्ष प्रश्‍न बँकासमोर असून शेतकरी आक्रमक होतांना दिसत आहेत.

तर काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकांनी राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. अशीच काहीशी अवस्था नगरसह अन्य बँकांची झाली आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हा बँका आणि शेतकर्‍यांतून होतांना दिसत आहे.
नोटबंदीचा मार जसा सामान्यांना बसलाय तसा तो या जिल्हा सहकारी बँकांनाही बसला आहे. जिल्हा बँका या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा आत्मा आहेत. नोटबंदीमुळे या बँकांमध्ये 2,771 कोटी 87 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. त्याचं करायचं काय असा प्रश्न जिल्हा बँकांसमोर आहे.

अद्याप या पैशाबाबत रिझर्व्ह  बँक तसेच केंद्र सरकारकडून कोणाताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याउलट बँकेत जमा झालेल्य रकमेवर बँकांना व्याज द्यावे लागत आहे. नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांचे व्यवहार मोठ्याप्रमाणात थंडावले आहेत.
राज्यातील 33 जिल्हा सहकारी बँकांमार्फत प्रत्येक वर्षी सुमारे 17 हजार कोटींचे शेतकर्‍यांना कर्ज वाटप केले जाते.

त्यापैकी खरिप हगामात 12 ते 13 हजार कोटी रूपये तर उरलेले चार ते साडेचार हजार कोटींचे कृषी कर्ज दिले जाते. मात्र, आता यासाठी जिल्हा बँका पैसा आणणार कुठून?, हाच मोठा प्रश्‍न असून बँकांनी मागणी करून देखील रीझर्व्ह बँकेकडून या जुन्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. त्यामुळे बँकांचे व्यवहार थंडावले असून शेतकर्‍यांकडून जिल्हा बँकेकडे कर्ज पुरवठ्यासाठी मागणी केली जात आहे.
जिल्हा बँकांच्या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली गेली. कोर्टानेही केवायसी करण्याचे आदेश दिले. नाबार्डनेही केवायसी केले. परंतु तरीही जुन्या नोटांबाबत निर्णय होतांना दिसत नाही.

बँक निहाय जुन्या नोटांची आकडेवारी
पुणे जिल्हा बँक 573 कोटी, नाशिक जिल्हा बँके 341 कोटी, सांगली 315 कोटी, कोल्हापूर 279 कोटी, जळगाव 209.54 कोटी, अहमदनगर 167.77 कोटी, सोलापूर 102.37 कोटी, सातारा 105.95 कोटी.

 अकोला, ठाणे, लातूर, यवतमाळ, अमरावती, औरंगाबाद, रायगड, चंद्रपूर, औरंगाबाद, गडचिरोली, भंडारा, परभणी, गोंदिया या जिल्हा सहकारी बँकांत 100 कोटींपेक्षा कमी जुन्य नोटा जमा झाल्या आहेत. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, उस्मानाबादमधीलबँकेत एकही जुनी नोट जमा झालेली नाही.

LEAVE A REPLY

*