जिल्हा बँकेने ‘एमडी’ नाकारले!

शिखर बँकेच्या ‘त्या’ अटीचा परिणाम

0

नाशिक | दि. २७ प्रतिनिधी जिल्हा बँकेच्या रिक्त व्यवस्थापकीय संचालकपदावर शिखर बँकेने दिलेले एमडी जिल्हा बँकेने एक अटीमुळे रुजू करून घेण्यास नाकारले आहेत. त्यामुळे एमडीपद अजून काही दिवस रिक्त असण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक यशवंत शिरसाठ यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले पद भरून काढण्यासाठी, शिखर बँकेने आपल्या प्रशासनातील तज्ज्ञ अधिकारी बकाल यांना नियुक्त करण्यासाठी जिल्हा बँकेला सूचीत केले होते.

सुमारे १६ अटीशर्तीचे पत्र देऊन शिखर बँकेने बकाल यांना जिल्हा बँकेत रुजू करण्यासाठी पाठवलेले होते. त्यासाठी आज जिल्हा बँकेत अधिकारी रुजू करून घेण्यासाठी संचालक मंडळाची तात्काळ सभा आयोजित करण्यात आलेली होती. अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह सुमारे १२ संचालकांची जिल्हा बँक सभागृहात उपस्थित होती.

शिखर बँकेने दिलेल्या पत्रात १२ ते १६ क्रमांकाची अट अशी होती की, जिल्हा बँकेच्या प्रशासकीय कामकाजात विद्यमान संचालक मंडळ आणि नव्याने नियुक्त करण्यात येणारे व्यवस्थापकीय संचालक यांच्यात एखादा निर्णय घेण्यावरून एकमत झाले नाही तर अशा बाबतीत शिखर बँकेला निर्णय घेण्याचा अधिकार असेल. नेमके हीच बाब संचालक मंडळाला खटकली.

त्यांनी आज झालेल्या बैठकीत व्यवस्थापकांना रुजू तर करून घेतले नाहीच, पण शिखर बँकेच्या पत्रात उल्लेख असलेल्या ११ ते १६ क्रमांकाच्या अटी मंजूर नसल्याचे कळवून याबाबत तुम्हीच निर्णय घ्यावा, असा लखोटा शिखर बँकेला पाठवला आहे. बैठकीतील कामकाजाची महिती देताना अध्यक्ष नरेंद्र दराडे म्हणाले की, बँकेला शिखर बँकेने जे पत्र पाठवले त्यात सुमारे १६ बाबी होत्या.

एमडींना किती पगार द्यावा, त्यांच्या कार्यकक्षा, प्रशासकीय अधिकारी आदी बाबी१ ते १० मुद्यात उल्लेखित होत्या. त्या बाबीवर चर्चा करून जिल्हा बँक संचालकांनी त्यावर सहती दर्शवली. मात्र ११ ते १६ क्रमांकांच्या बाबी अशा होत्या की, संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यात एखाद्या निर्णयावरून एकमत झाले नाही तर त्याबाबत शिखर बँक निर्णय घेईल, असे नमूद होते. यावर कोणत्याच संचालकांनी सहमती दर्शवली नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने पुन्हा शिखर बँकेला पत्र पाठवून तुम्हीच मार्गदर्शन करावे, असे कळवले आहे.

LEAVE A REPLY

*