पांझरा चौपाटीच्या जागाचे मनपाकडे हस्तांतरण !

0
धुळे । दि.22 । प्रतिनिधी-शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या पांझरा चौपाटीवरील खाद्य पेय विक्रीचे स्टॉल हटविण्यात आल्यानंतर सदरची जागा मनपाकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी याफसंदर्भातील पत्र मनपा प्रशासनाला आज दिले. येत्या 4 ऑगस्टपर्यंत या जागेच्या विकासाबाबतची माहिती मनपा प्रशासन न्यायालयाला सादर करणार आहे.
पांझरा चौपाटीवरील अतिक्रमण काढण्यात यावे, यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मंगळवारी रात्री पांझरा चौपाटीचे अतिक्रमण काढण्यात आले.
चोख पोलिस बंदोबस्तात ही कारवाई झाल्यानंतर त्याठिकाणचे खाद्यपेय विक्रीचे स्टॉल नवरंग टॉकी परिसरात नेवून ठेवण्यात आले.
दरम्यान, चौपाटीची जागा रिकामी केल्यानंतर त्यासंदर्भातला छायाचित्रांसह अहवाल सादर करण्याचे न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला सांगितले होते.

त्यानुसार तहसीलदार ज्योती देवरे यांनी आज चौपाटीचे अतिक्रमण हटविल्याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर केला.

यावेळी सदर चौपाटीची जागा मनपाच्या ताब्यात केव्हा देणार आहात? अशी विचारणा न्यायालयाने तहसीलदारांना केली. त्यावर अतिक्रमण हटविण्यानंतर आम्ही कालच सदरची जागा मनपाकडे हस्तांतरीत करणार होतो.

परंतु काही तांत्रिक अडचण आल्याने हस्तांतरण करता आले नाही, असे तहसीलदारांनी सांगितले. त्यावर, आता जागेचा ताबा मनपाला केव्हा देणार आहात? असे न्यायाधिशांनी विचारले.

आम्ही आतापासूनच जागेचा ताबा मनपाला देत आहोत, असे तहसीलदारांनी न्यायालयात सांगितले. त्याचप्रमाणे सदर जागेचा विकास केव्हा व कशा पध्दतीने करणार आहात? अशी विचारणा न्यायालयाने मनपा प्रशासनाला केल्यावर सदरची जागा अद्याप आमच्या ताब्यात आलेली नाही.

ताबा मिळाल्यानंतर 4 ऑगस्टपर्यंत त्यासंदर्भात आम्ही सगळी माहिती सादर करू, असे मनपा प्रशासनातर्फे न्यायालयात सांगण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हाधिकार्‍यांनी आज लगेचच लेखी पत्र मनपाला सादर केले. सदरची जागा मनपाकडे हस्तांतरीत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी या पत्रात नमूद केले आहे.

 

LEAVE A REPLY

*