नव्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना

0
धुळे / येत्या 2017-18 या शैक्षणिक वर्षांपासून तंत्रशिक्षणासाठी अन्य राज्यांप्रमाणे एकाच तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्याचे निश्चित केले असून रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे मुख्यालय असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठा अंतर्गत राज्यातील अभियांत्रिकी, औषध निर्माण, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालये 2019 पर्यंत टप्प्या टप्प्याने सहभागी होणार आहेत.
तंत्रशिक्षणासाठी पूर्ण राज्यभरासाठी विद्यापीठ निहाय वेगवेगळे निकष न ठेवता शैक्षणिक समानतेवर आधारीत एकच अभ्यासक्रम, एकच प्रकारची परिक्षा पध्दती व एक पदवी एकच विद्यापीठ ही गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी व पालकांची मागणी या निमित्ताने पूर्णत्वास येत आहे.

या नवीन तंत्रज्ञान विद्यापीठास येत्या शैक्षणिक वर्षापासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सध्या कार्यरत सात महाविद्यालयांनी प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी संलग्नता मिळवली आहे.

यात धुळे जिल्ह्यातून शिवाजी विद्या प्रसारक संघटनेचे बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नंदुरबार जिल्ह्यातून पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव जिल्ह्यातून फैजपूर येथील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय, भुसावळ येथील संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व केसीई अभियांत्रिकी महाविद्यालय या महाविद्यालयांचा समावेश आहे.

शासनाने नुकतीच चार सदस्य समिती नियुक्त करुन या सर्व महाविद्यालयांना भेट देऊन महाविद्यालयातील सर्व सोयी सुविधांची निष्पक्षपणे चौकशी करून शासनाला वस्तुनिष्ठ व सविस्तर अहवाल सादर केला होता.

नुकतेच या संबंधित महाविद्यालयांना सलग्नतेस पात्र ठरवले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डॉ.व्ही.जी गायकर यांची शासनाने नुकतीच नियुक्ती केली असून त्यांनी तंत्रज्ञानाच्या अनेक नवनवीन संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे.

या प्रस्तावित विद्यापीठा मार्फत विद्यार्थ्यांना बी.ई. ऐवजी बीटेक व एमई ऐवजी एमटेक पदवी मिळणार आहे. यात उद्योग जगताची मनुष्यबळाची गरज ओळखून अभ्यासक्रम तयार करण्यात येईल व त्या योगे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य व व्यक्तीमत्व विकासात भर पडेल, उद्योग जगतातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना लाभ होईल.

अभियंत्यांसाठी महत्वाचे प्रात्यक्षिक शिक्षणावर जास्त भर राहणार आहे. तसेच मेडिकलच्या विद्यार्थ्यांप्रमाणे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनाही शेवटचे सत्र उद्योग जगतात इंटरशिप करावी लागणार आहे.

सुटसुटीत परिक्षा प्रणालींमुळे निकालात गतीमानता येईल व नापास विद्यार्थ्यांची तात्काळ फेरपरिक्षा घेतल्याने उत्तीर्ण होणार्‍यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

डिजीटल क्लासरम, ई लर्निंग, व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा व ट्रेनिंग ही नवीन विद्यापीठाची महत्वाची वैशिष्ट्ये असतील, विद्यापीठाच्या संकेत स्थळावर अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका संच, मॉडेल उत्तरपत्रिका हजेरी इ. बघता येणार आहेत.

पालकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय, टाळण्यासाठी राज्यात महत्वाच्या मुुंबई, पुणे नागपूर येथे ठिकाणी संपर्क केंद्र व औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड येथे उपकेंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत. बी.टेक व एम टेक विद्यार्थ्यांसाठी संशोधनासाठी विशेष अनुदानाची सुविधा मिळणार आहे व महत्वाचे म्हणजे सेंट्रलाईज्ड, प्लेसमेंट मोहिमे अंतर्गत नामांकित राष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपनीत विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीच्या संधी मिळतील. तसेच उद्योजकता विकास सेल अंतर्गत विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी तज्ज्ञाद्वारे प्रशिक्षणाची सोय होणार आहे. राज्याच्या सर्व भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण स्थानिक पातळीवरच मिळायला लागल्यावर मोठ्या शहरांकडे जाणारा ओढा निश्चितच कमी होईल. 2019 पर्यंत राज्यातील सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यापीठाचे स्वागत करू. या व दर्जेदार शिक्षणाचा लाभ घेऊ या. लवकरच या नूतन विद्यापीठाचे कुलगुरु, कुलसचिव, अधिष्ठाता आपल्या शहरात येऊन विद्यार्थी व पालकांशी हितगुज साधून नव्या विद्यापीठाच्या संकल्पना विस्तृतपणे मांडणार आहेत.

LEAVE A REPLY

*