ट्रक-मोटारसायकल अपघातात डॉक्टरसह दोन जण ठार

0
धुळे / लग्नसोहळा आटोपून घरी परत जातांना आयशर गाडीने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात डॉक्टरसह दोन जण ठार झाल्याची घटना शिरपूर-शहादा रस्त्यावरील तर्‍हाडी, ता.शिरपूर गावाच्या ममाणे शिवारात घडली.
 लग्नसोहळा आटोपून डॉ.हिमांशू हेमंतकुमार शर्मा (वय 25), रा.कोपर्ली व आकाश दिलीप सावळदेकर (वय 19), रा.लोणखेडा हे दोघे जण एमएच 18 डीएन 9192 क्रमांकाच्या मोटारसायकलने शहाद्याकडे जात असताना ममाणे शिवारात नाल्याच्या पुलाजवळ एका वाहनाला हुलकावणी देण्याच्या प्रयत्नांत मोटारसायकल आयशर ट्रकवर धडकली.
अपघातात आकाश सावळदेकर जागीच ठार झाला तर डॉ.शर्मा हे गंभीर जखमी झाले. डॉ.शर्मांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच शर्मांचा मृत्यू झाला.
डॉ.शर्मा यांची आत्या शिरपूर येथे राहते. तिला अपघाताबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर खोपर्ली येथील कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.
डॉ.हेमांशू दीड वर्षापूर्वी शिरपूर येथील डॉ.दिघारे यांच्याकडे प्रॅक्टीस करीत होते. आकाश हा कपांऊडर म्हणून शहाद्याला कामाला होता.
आकाशच्या पश्चात एक बहिण व आई-वडील तर हिमांशूच्या पश्चात भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.
याबाबत दिलीप दगडू सावळदेकर यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यात म्हटले आहे की, आयशर वाहन शहाद्याकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने जात असताना मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात दोन जण ठार झाले. त्यांच्या मृत्यूस ट्रकचालक कारणीभूत आहे.

सट्टा पिढीवर छापा – स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पिंपळनेर, ता.साक्री येथे दोन ठिकाणी सट्टा व जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपनिरीक्षक एन.के.पठाण, सचिन गोमसाळे, नितीन मोहने, चेतन कंखरे, विजय सोनवणे, दीपक पाटील यांच्या पथकाने पिंपळनेर येथील सामोडा चौफुली, सटाणा रोडवर एका हिरव्या कापडाच्या शेडखाली सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्या ठिकाणी आनंदा काळू भोये हा अंक सट्ट्याच्या आकड्यावर पैसे स्विकारुन जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून तीन हजार 230 रोख व जुगाराच्या पावत्या सापडल्या. त्यानंतर सटाणा रोडवर असलेल्या हॉटेल चंदनच्या मागे सुरु असलेल्या सट्टा अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. तेथे विजय मंगा सूर्यवंशी हा अंक सट्ट्याच्या आकड्यावर पैसे स्विकारुन जुगार खेळतांना आढळून आला. त्यांच्याकडून तीन हजार 730 रुपये, मिलन अंक सट्ट्याच्या आकड्याच्या पावत्या, कार्बन जप्त करण्यात आले.

महिलेचा मृत्यू – अजंग, ता.धुळे गावातील ग्रामपंचायतीच्या विहीरीत उज्ज्वलाबाई महेश पाटील (वय 45) ही शनिवारी दुपारी चार वाजता विहीरीत पडली. त्यात तिचा मृत्यू झाला. याबाबत अजंगचे पोलिस पाटील दिलीप भालेराव पाटील यांनी तिला मृतावस्थेत सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ.अरुणकुमार नागे यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत पोलिस नाईक टी.सी.चंद्रात्रे यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

परस्पर पैसे काढले – शिरपूर तालुक्यातील बुडकी येथील रहिवासी बादल शंकर साळुंखे (वय 44) यांचे एटीएम दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजेदरम्यान हरवले होते. ते एटीएम कार्डचा शोध घेत असताना त्यांच्या बँक खात्यातून परस्पर दहा हजार रुपये अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याचा एसएमएस त्यांच्या मोबाईलवर आला. त्यानंतर बादल साळुंखे यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात एक ठार – मुंबई- आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळील पुलाच्या पुढे रस्त्यावर धावणार्‍या ट्रकवर पाठीमागून येणारी दुसरी ट्रक धडकली. यात ट्रकचालक जागीच ठार झाला. मुंबई- आग्रा महामार्गावरुन टीएन 28 पीएल 7933 क्रमांकाची ट्रक श्रीनिवास रामास्वामी हा नेत असताना रस्त्यावर पुढे धावणारी टीएन 24 एडी 5198 क्रमांकाची ट्रक गतिरोधकाजवळ हळू करण्यात आली. त्यामुळे पाठीमागून येणारी ट्रक धडकली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. तसेच श्रीनिवास रामास्वामी हा चालक जागीच ठार झाला. याबाबत आझादनगर पोलिस ठाण्यात हेकाँ आर.डी.साळुंखे यांनी माहिती दिली. त्यावरुन अपघाताची नोंद करण्यात आली.

वृध्दाला मारहाण – निळगव्हाण येथे राहणारे विनायक झगा नेरकर यांच्याशी शेतीच्या वाटणीवरुन दि.12 मे रोजी भटू झगा नेरकर यांनी वाद घातला. या वादातून भटूसह तिघांनी विनायक यांच्या शेतात प्रवेश करुन त्यांना काठीने व दगडांनी मारहाण केली. हात फ्रॅक्चर करुन डोके फोडून गंभीर जखमी केले. याबाबत विनायक झगा नेरकर यांनी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

म्हशींची चोरी – निमगूळ, ता.शिंदखेडा येथे राहणारे कल्याण सखाराम बागल यांच्या मालकीचा गावात खळे आहे. या खळ्यात दोन म्हशी सुमारे 50 हजार रुपये किंमतीच्या बांधलेल्या होत्या. अज्ञात चोरट्याने सदर म्हशी दि.13 मे रोजी सायंकाळी सहा ते रात्री 12 वाजेदरम्यान चोरुन नेल्या. याबाबत कल्याण बागल यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनपोत लंपास – शहादा येथे राहणार्‍या ज्योती शैलेंद्र धोबी या दि.14 मे रोजी दुपारी दोन वाजता दोंडाईचा बसस्थानकामध्ये एमएच 14 बीटी 0544 क्रमांकाच्या बसमध्ये बसलेल्या असताना अज्ञात चोरट्याने ज्योती धोबी यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किंमतीची मंगलपोत चोरुन नेली. याबाबत ज्योती धोबी यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील जेबी रोडवरील टावर बगीचा गेट समोरुन रवींद्र पंडीत पगारे यांच्या मालकीची सोन्याची मंगलपोत व मोबाईल असा दहा हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. याबाबत रवींद्र पगारे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

तरुणी बेपत्ता – अजंग, ता.धुळे येथे राहणारी उज्ज्वला झिंगा पाटील (वय 22) ही दि.13 मे रोजी दुपारी 4.30 वाजता घरात कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली. ती रंगाने गोरी असून शरीराने सडपातळ, अंगावर लाल साडी परिधान केली आहे. तिला अहिराणी व मराठी बोलता येते. याबाबत महेश झिंगा पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन मिसिंग दाखल करण्यात आली.

गळफास घेवून आत्महत्या – लघडवाड, ता.साक्री येथे राहणारा चिमण देवाजी बोरसे (वय 55) याने दि.14 मे रोजी दुपारी 12 वाजता राहत्या घराच्या छताच्या लाकडी दांड्याला गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत पिंट्या चिमण बोरसे यांनी साक्री पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विष घेवून आत्महत्या – खर्दे, ता.शिंदखेडा येथे राहणारा ठाणसिंग झामू बंजारा (वय 55) याने दि.8 मे रोजी सायंकाळी 6.50 वाजता काही तरी विषारी औषध घेतले. त्याला त्रास होवू लागल्याने दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली. तेथे त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ.शोएब यांनी तपासून ठाणसिंगला मृत घोषित केले. याबाबत काशिनाथ ठाणसिंग बंजारा यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शिंगावे, ता.शिरपूर येथे राहणारा भाईदास शिवाजी भिल (वय 55) याने दि.3 मे रोजी सकाळी नऊ वाजता काहीतरी विषारी औषध घेतले. त्याला त्रास होवू लागल्याने शिरपूर कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेत असताना डॉ.गितांजली सोनवणे यांनी तपासून भाईदासला मृत घोषित केले. याबाबत पोहेकाँ पानपाटील यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विहिरीत पडून मयत – बारीपाडा, ता.साक्री शिवारातील चैत्राम पवार यांच्या शेतातील विहिरीचे बांधकाम पाहत असताना बाजीराव मगन पवार (वय 34) याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. त्याच्या डोक्यास गंभीर जखम झाली. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून बाजीरावला मृत घोषित केले. याबाबत सुनील बाजीराव पवार यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दारुसाठा पकडला


मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या हॉटेल सानिया पार्कच्या मागील बाजूस असलेल्या ट्रक टर्मिनल गोडावूनमध्ये चोरटी विक्री करण्यासाठी दारुचा साठा करुन ठेवल्याची माहिती पोना बी.डी.कोकणी यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोसई बी.जे.शिंदे यांनी छापा टाकला असता तेथे 44 हजार 518 रुपये किंमतीची वेगवेगळ्या ब्रॅण्डचा विदेशी दारुचा साठा आढळून आला. पोलिसांनी दारुचा साठा जप्त केला आहे. याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात मुंबई प्रोव्हिशन कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई आज सकाळी दहा वाजता करण्यात आली. दारुसाठा करणारा मालक व अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. सदर कारवाई सपोनि शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक भास्कर शिंदे, महेंद्र गवळी, पोहेकाँ मराठे, पोना बापू कोकणी, लोहार, भावसार, पोकाँ जितेंद्र वाघ, अविनाश वाघ यांच्या पथकाने केली.

नगाव येथे मारहाण; सात जणांविरुध्द गुन्हा
नगाव, ता.धुळे येथे राहणारी निर्मलाबाई मोहन पाटील (वय 65) यांना साडी लग्नात वापरण्यासाठी अनिता दिलीप ठाकूर हिने साडी दिली होती. सदर साडी निर्मलाबाई यांच्याकडून खराब झाली. त्यामुळे अनिताने निर्मलाबाईकडे साडीचे पैसे मागितले. यातून अनितासह सात जणांनी निर्मलाबाई यांना शिवीगाळ करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी निर्मलाबाईची मुले समाधान व मनोज हे समजविण्यासाठी गेले असता त्यांनाही हाताबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत समाधान व मनोज यांच्या अंगावरील कपडे फाडून नुकसान केले. याबाबत निर्मलाबाई मोहन पाटील यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 143, 147, 149, 323, 504, 506, 426, 427 प्रमाणे अनिता दिलीप ठाकूर, दिलीप ठाकूर, विकी दिलीप ठाकूर, गोलू दिलीप ठाकूर, पिंटू अशोक ठाकूर, बबलू अशोक ठाकूर, मुन्ना अशोक ठाकूर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याबाबत प्रशांत दिलीप ठाकूर यांनी परस्पर तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, समाधान मोहन पाटीलसह चार जणांनी अनिताबाई यांना शिवीगाळ केली. याबाबत प्रशांत दिलीप ठाकूर हा समजविण्यासाठी गेला असता समाधान मोहन पाटील याने प्रशांतच्या डोक्यावर विट मारली व खाली पाडले. यामुळे प्रशांत हा जखमी झाला व अन्य जणांनी मारहाण केली. त्यांच्या तक्रारीवरुन पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात भादंवि 324, 323, 504, 34 सह अजाज अत्याचार प्रतिबंध अधि 1989 चे सुधारणा अधि. 2015 चे कलम 3 (1)(आर)(एस) प्रमाणे समाधान मोहन पाटील, मनोज मोहन पाटील, भटाबाई मोहन पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला..

LEAVE A REPLY

*