कापूस पिकाला नुकसान भरपाई द्या !

0

धुळे । कापसावरील गुलाबी बोंड आळीमुळे कापूसपिकाचे भवितव्य नष्ट झाले असून कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

आगामी काळात कापसाची लागवड टिकवून ठेवायची असेल तर खरीप हंगाम सन 2016-17 च्या कापूस लागवडी क्षेत्राला सलग 100 टक्के नुकसान गृहीत धरुन शेतकर्‍यांना प्रती हेक्टर किमान 25 हजार रुपयांची मदत शासनाने तात्काळ जाहीर करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे माजी आ. प्रा.शरद पाटील व अ‍ॅड.प्रकाश पाटील यांनी पत्रकाव्दारे दिला आहे.

यंदा कापसावर गुलाबी बोंडआळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या दोन दशकातील कापसावरचे हे सगळ्यात मोठे संकंट आहे. इतर किडी, आळ्या व लाल्या रोगामुळे कापसाचे आजपावेतो जेवढे नुकसान झाले नाही. त्यापेक्षा कितीतरी पटीने कापूसपिक नष्ट झाले आहे. सुरुवातीच्या काळात कापसावर दिसणार्‍या किडे व आळ्यांमुळे शेतकर्‍यांच्या यंदा फवारणीचा खर्च दुपटीने वाढला आहे.

अशा कापसाचा सरासरी उत्पादन खर्च दीड पटीने वाढला असून वेचणीचा माणसी दर 210 रुपयांपर्यंत गेला आहे. यावर्षी कापूस उत्पादनात गतवर्षापेक्षा 50 टक्के घट आली आहे.

जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना नुकसान भरपाई न दिल्यास जिल्हाधिकारी कचेरीवर आंदोलन करण्याचा इशाराही प्रा.शरद पाटील, अ‍ॅड.प्रकाश पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजीराव देशमुख, जगदिश पाटील, शेतकरी संघटनेचे गुलाबसिंग रघुवंशी, निवृत्त अभियंता ए.के.पाटील, आत्मारामबाप्पा पाटील यांनी एका पत्रकाव्दारे दिला आहे.

LEAVE A REPLY

*