शेतीसाठी छळ होत असल्याने विवाहितेने पेटवून घेतले

0

धुळे ।

विवाहितेची आत्महत्या – द्राक्ष शेतीसाठी चार लाख रुपये आणावेत, यासाठी सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने पेटवून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे घडली. याबाबत साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी माजीद रमेश पटवे (रा.कासारे) भावसार गल्ली ह.मु. पिंपळनेर ता. साक्री यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नजमाबी इस्माईल अत्तार (वय 35) यांचा द्राक्ष शेतीसाठी चार लाख रुपये आणावे म्हणून छळ केला जात होता.

त्यासाठी सासरच्या लोकांकडून शिवीगाळ करून मारहाण केली जात होती. त्याला कंटाळून नजमाबी अत्तार हिने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले होते.त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

त्यानुसार साक्री पोलिस ठाण्यात पती इस्माईल अब्बास अत्तार, जेठ आयुब अब्बास अत्तार, जेठाणी समरीनबी नादीम अत्तार, मलूू आफिक इस्माईल अत्तार, जेठचा मुलगा नदीक अयुब अत्तार या पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही. यू. पवार करीत आहेत.

मेंढ्या चारल्या: हाणामारी –
शेतात मेंढ्या चारल्याच्या कारणावरून साक्री तालुक्यातील गंगापूर गावालगत हाणामारी झाली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी इंदूबाई राजू वाघमोडे (वय 36) रा. हटकरवाडी, चितोड रोड, धुळे ह.मु. गंगापूर यांनी तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शेतात मेंढ्या चारल्याच्या कारणावरून पंडित सखाराम गरदरे, जिजाबाई पंडित गरदरे, खुशाल पंडित गरदरे, सारिका पंडित गरदरे (सर्व रा.गंगापूर) यांनी मारहाण केली.

त्यानुसार साक्री पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल के.एन. पायमोडे करीत आहेत.

विवाहीतेचा छळ
शेतीसाठीतीन लाख रुपये आणावे या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. तसेच तिच्या वडिलांच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये काढून घेतले. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी नेहल खंडू गवळी (रा.पोलिस मुख्यालय, बिल्डिंग नं.21 रूम.नं. 5) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती खंडू बाळू गवळी, सासू नबू बाळू गवळी, सासरे बाळू धडू गवळी, दीर राजेंद्र बाळू गवळी, दिराणी सुनंदा राजेंद्र गवळी (रा. मंडाणे, ता.साक्री) यांनी 28 एप्रिल 2016 ते ऑगस्ट 2017 सासरी माहेरून शेतीसाठी तीन लाख रुपये आणले नाही या कारणावरून शिवीगाळ करीत दमदाटी केली. शारीरिक मानसिक छळ करून घरातून हाकलून दिले.

वडिलांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून दोन लाख रुपये काढून घेऊन ते परत करता फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. तपास हेडकॉन्स्टेबल एम.एस. बडगुजर करीत आहेत.

तिहेरी अपघात – मुंबई-आग्रामहामार्गावर टँकर, ट्रक क्रुझरचा तिहेरी अपघात झाला. याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर टँकरने (क्र.यूपी 15- एटी 8941) दभाशी फाट्याजवळ समोरून येणार्‍या कंटेनरला (क्र.एचआर-55 एस 6726) धडक दिली.

कंटेनर मागून येणार्‍या क्रुझरलाही (क्र. एमएच 18, ए.जे. 3270) धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

अपघातानंतर ट्रकचालक रवींद्रकुमार भिकारीलाल कटारिया पळून गेला. अपघातात अशोक सोनवणे, कंटेनरचा चालक जखमी झाले.

याबाबत गरताड येथील अशोक देविदास सोनवणे (पाटील) यांच्या तक्रारीवरून टँकरचालक रवींद्रकुमार कटारिया (रा.मिर्झापूर, ता. सहारनपूर) याच्या विरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

LEAVE A REPLY

*