अक्कलपाड्याचे दुसरे आवर्तन सुटले !

0
धुळे / अक्कलपाडा प्रकल्पातील 200 दलघफु पाणी सोडण्यात आले असून सुमारे 65 किलोमिटर अंतरापर्यंत हे पाणी पांझरा नदी पात्रातून वाहत जाणार आहे. यामुळे नदी काठावरील 85 गावांना फायदा होऊन पिण्याच्या आणि गुरांसाठीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
सध्या अनेक गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पशुनांही पाणी उपलब्ध होत नसल्याने ही परिस्थिती लक्षात घेवून अक्कलपाड्यातील पाणी तातडीने सोडण्यात यावे, पाणी न सोडल्यास जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या आदेशाने आज दि.29 रोजी दुपारी 1.30 वाजता पाटबंधारे विभागाने हे पाणी सोडले.

300 क्युसेस पाण्याचा प्रवाह असून धरणातील एकूण 312 दलघफु पाण्यापैकी 200 दलघफु पाणी सोडले जात आहे. येत्या दोन दिवसात हे पाणी धुळे शहरापर्यंत पोहचेल.

यासाठी प्रकल्पस्थळी दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शेतकर्‍यांची कपाशी लागवड सुरु असून यासाठीही या पाण्याचा उपयोग होणार आहे.अक्कलपाडा धरणातील या आवर्तनाचा फायदा धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील 85 गावांना होणार असून यामुळे सध्या बंद पडलेल्या नळपाणी पुरवठा योजना पुन्हा सुरु होणार आहेत.

तसेच पांझरा काठावरील अनेक शेतकर्‍यांच्या शेतविहीरींचे पाझर वाढणार असून भाजीपाला, कांदा व चारावर्गीय पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे.

त्यामध्ये नेर, अकलाड, मोराणे, कुसुंबा, मेहरगाव, कावठी, आनंदखेडे, वार, कुंडाणे, मोराणे प्र. (लळींग), वलवाडी, धुळे शहर, वरखेडे, कुंडाणे, जापी, आर्णी, निमखेडी, शिरडाणे, कापडणे, धमाणे, मोहाडी, सातरणे, वणी, सुकवड, न्याळोद, बिलाडी, नगांव, तामसवाडी, कौंठळ, हेंकळवाडी, कंचनपूर, वालखेडा, अजंदे, बेटावद, पडावद, मुडावद, अमळनेर तालुक्यातील जवखेडा, मांडळ, बामणे, भिलाली, शहापूर, तांदळी आदी 85 गावांना या पाण्याचा फायदा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*