जीवन प्राधिकरण अधिकार्‍यांना कोंडले !

0
धुळे / 136 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेत ठेकेदारांसह अधिकार्‍यांचा मनमानी कारभार सुरु असल्याच्या निषेधार्थ मनपा स्थायी सभापती कैलास चौधरी यांच्यासह देवपूर भागातील नागरिकांना आज नवरंग टाकीजवळ ठिय्या आंदोलन केले.
यावेळी जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना स्थायी सभापतींनी कार्यालयात कोंडून ठेवले.
योजनेचे काम पावसाळ्यापूर्वी पुर्ण व्हावे यासंदर्भात ठोस निर्णय केले जावेत अशी मागणी सभापतींनी यावेळी केली.
शहरात 136 कोटी रुपयांची पाणी योजना राबविण्यात येत आहे ही कौतुकांची बाब आहे. मात्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे त्या ठेकेदाराची मनमानी थांबली पाहिजे.
देवपूरातील एकविरा देवी मंदीर भागात हे काम होणार असून या भागातील जुनी पाईपलाईन काढण्यात येईल. एकविरा देवी भक्तनिवास पर्यंत सदरची पाईपलाईन नव्याने टाकण्यात यावी अशा मागणीचा प्रस्ताव स्थायी सभापतींनी दिला आहे.

मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या प्रस्तावावर विचार झालेला नाही. ठेकेदारांनी काही महिन्यांपासून रस्त्यावर खड्डे खोदून ठेवले आहे. काम मात्र सुरु केलेले नाही. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यामुळेच सभापती कैलास चौधरी यांनी आज सकाळी नवरंग पाण्याची टाकी गाठली. याठिकाणी ठेकेदारासह अधिकारी व कर्मचार्‍यांना जाब विचारला.

मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कैलास चौधरी यांनी सर्वांना कार्यालयातच कोंडले. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका सभापतींनी घेतली.

सकाळी 9 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत आंदोलन सुरु होते. यावेळी कैलास चौधरी यांच्या समवेत हेमंत गुरव, वसंत मोरे, जाबीर शेख, सनिर काटे, जगन माळी, प्रविण चौधरी, राजु चौधरी आदी सहभागी झाले.

LEAVE A REPLY

*