वादळामुळे वीजतार तुटून दोन बालकांचा मृत्यू

0
धुळे / वालखेडा, ता.शिंदखेडा शिवारात आज वादळामुळे वीजेची तार तुटून शेतात निंबाच्या झाडाखाली खेळत असलेल्या दोन बालकांच्या अंगावर पडली.
त्यामुळे दोघांना विजेचा धक्का बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, धुळे व शिंदखेडा तालुक्यात आज वादळ झाले तर काही ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावली.

जिल्ह्याच्या तापमानाचा पारा आज 43 अंशावर स्थिरावला होता. दिवसभर प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता, परंतु सायंकाळी साडेपाच वाजेनंतर वातावरणात बदल झाला.

धुळे व शिंदखेडा तालुक्यात वादळ झाले. या वादळामुळे काही ठिकाणी घराचे पत्रे उडाले तर लग्नसमारंभासाठी उभारण्यात आलेला मंडपही वादळामुळे कोसळून पडला.

वालखेडा, ता.शिंदखेडा शिवारात आज सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास जोरदार वादळ झाले. या वादळामुळे काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या.

वालखेडा शिवारात सुरेश पाटील यांच्या मालकीच्या शेतात निंबाच्या झाडाखाली ममता मदन पावरा (वय 7) आणि संजय संतोष पावरा (वय 10) हे दोघेजण खेळत असतांना त्यांच्या अंगावर विजेची तार पडली.

त्या दोघांना विजेचा धक्का बसला. दोघे जण गंभीररित्या जळाले. दोघा जळीतांना नरडाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी ममता आणि संजय या दोघांना मृत घोषित केले.

मे हिटचा तडाखा जाणवत असतानाच मेच्या दुसर्‍या आठवड्यात शहरात बेमोसमी पाऊस झाला होता. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

आता पुन्हा वादळाचा तडाखा धुळे आणि शिंदखेडा तालुक्याला बसला. यात पुन्हा लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

*