मनपा आयुक्तांच्या घरावर हल्ला करणार्‍या सुत्रधारावर कारवाई करा !

0
धुळे / मनपा आयुक्त श्रीमती संगीता धायगुडे यांच्या निवास्थनावर हल्ला करणार्‍या दोषींना शोधून काढून कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज विविध संघटनांतर्फे आंदोलन करण्यात आले.

धुळे सिटीजन फोरम
धुळे सिटीजन फोरमतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरातील विविध क्षेत्रत काम करणार्‍या सार्वजनिक संस्थाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने आयुक्त श्रीमती संगीता धायगुडे यांच्या निवास स्थानावर दि.19 मे रोजी रात्री झालेल्या दगड हल्याचा जाहीर निषेध करत आहोत. या हल्यातील प्रत्यक्ष दगडफेक करणारे आरोपी व त्यांना त्यासाठी प्रवृत्ती करणारा या हल्याचा सुत्रधार प्रशासने ताबडतोबीने शोधून काढून त्यांच्यावर कठोर कलमान्वये कारवाई करावी अशी आम्ही मागणी करीत आहोत.

आयुक्त श्रीमती संगीता धायगुडे या धुळे मनपात कोणाच्याही दबावाखाली न येता नि:पक्षपातीपणे चांगले काम करीत आहेत. विक्रमी वसुली, स्वच्छता अभियानातले यश, कर्मचार्‍यातील शिस्त आदी अनेक कामगिर्‍यांमुळे शासनाने त्यांचा गौरवदेखील केला आहे. मनपाची आर्थिक घडी बसवून, नियमाने काम करीत असतांना काही मंडळींचा चुकीच्या कामांसाठी येणारा दबाब त्यांनी जुमानला नाही. म्हणून हा हल्ला करण्यात आला असावा.

धुळे शहरात याप्रकारे नि:पक्षपातीपणे काम करणार्‍या, दबावात न येणार्‍या अधिकार्‍यांना धमकावणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, अश्लिल फोन करणे, बदनामीच्या अफवा पसरविणे या प्रकारे हल्ले करून त्यांना बदली करून घेण्यास भाग पाडणे, असे प्रकार सतत होत आहेत. धुळे शहरातील एकुणच चांगल्या अधिकार्‍यांना नि:पक्षपातीपणे, दबावरहित काम करून देण्यासाठी या प्रकारच्या समाज घातक मंडळींचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. या अधिकार्‍यांना शहरातील नागरिकांचेही पाठबळ मिळे आवश्यक आहे. यासाठी शहरातील विविध स्तरातील आम्ही प्रमुख नागरिक एकत्र येवून या प्रतिकात्मक धरणे आंदोलनातून हल्लेखोर व त्यांचे सुत्रधार यांच्यावर कठोर कारवाईकरावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

लाल बावटाचा निषेध मोर्चा- लाल बावटातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयुक्त यांच्या घरावर काही समाज कंटकांनी दगडफेक करुन त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे एक प्रकारे विरोधच केलेला दिसतो आहे. हा प्रकार करणार्‍या विरोधात सर्व थरातून विरोध होत असून धरणे आंदोलने मोर्चा निघत आहे.
त्याच्यामागे जशी धुळ्यातील जनता आहे. तशीच आमची युनियन ही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. समाज कंटकांना त्वरित अटक करून त्यांचेवर कार्यवाही करावी अशी आमची युनियनची मागणी करीत आहे. संतोष निंबा शिंदे, विलास भास्कर हाताळगे, हासिन मुश्ताक, दौलत देवरे, बापू अहिरे, किरण धर्मा, अंबादास थोटे, लाल बावटा मनपा कामगार युनियनच्या सर्व सभासदांनी या निषेध मोर्च्यात सामील झाले होते.

LEAVE A REPLY

*