आ.खडसेंनी मुख्यमंत्र्यांना शब्द टाकला तर धुळ्यात कृषी विद्यापीठ शक्य !

0
धुळे / राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना धुळ्यातच कृषी विद्यापीठ स्थापन करा,असा शब्द टाकला तर मुख्यमंत्र्यांना तात्काळ धुळ्यात कृषी विद्यापीठाची घोषणा करावीच लागेल, असे स्पष्ट मत कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निमंत्रक व शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी व्यक्त केले.

एकनाथराव खडसे यांनी धुळ्यात आले असता कृषी विद्यापीठाचा विषय काढला होता. त्यावर प्रा.पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
धुळ्याचे राजकारण, नियोजित कृषी विद्यापीठ व जिल्ह्याच्या विकास प्रश्नांबाबत खडसे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.यावेळी श्री.खडसे म्हणाले, विकासाच्या योजना समन्वयाने घ्यावयाला हव्यात. विद्यापीठाच्या प्रश्नावरुन तुमचे शरद पाटील भांडायला निघायचे. आता त्यांना म्हणावं, कोणाशी लढणार? कृषी विद्यापीठ धुळे अथवा जळगांवला झाले असते तरी ते खान्देशातच राहिले असते. आता मला नं तुला…! अशी स्थिती आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील नेते योजना पदरात पाडून घेतात. आपल्याकडे मात्र भांडणातच वेळ जातो, असे खडसे म्हणाले होते.

खडसे यांच्या या विधानांवर प्रा.शरद पाटील यांनी म्हटले आहे की, खडसे हे खान्देशाचे लढाऊ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला व जिल्ह्याला नितांत आदर आहे. खडसे ज्या पक्षाचे नेतृत्व करतात, त्या पक्षाचे सहयोगी सदस्य असताना आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून त्यांचा आदरच केला आहे.

त्यामुळेच धुळे जिल्ह्यात भाजपाला एवढे यश मिळाले आहे. हा जिल्हा भाजप पक्षाशिवायही त्यांचा आदर करतो. तापीचे बॅरेजेस, अक्कलपाडा धरणाच्या निर्मितीसाठी त्यांनी दिलेले योगदान आम्ही विसरु शकत नाही.

मात्र विकासाचा अनुशेष भरताना धुळे जिल्हा जळगांवपेक्षा निश्चित मागासलेला आहे, हे आम्ही वारंवार शासनाला ओरडून सांगत आहोत. माझ्या जिल्ह्यावर होणारा अन्याय जाहीरपणे मांडणे, हे कर्तव्य आहे.

कृषी विद्यापीठ निर्मितीसाठी धुळे हे सर्वोत्तम स्थान आहे. हे दोन समितींच्या अहवालावरुन आम्ही शासनास सांगत आहोत. त्याला खडसेंनी भांडण समजू नये, असेही प्रा.पाटील यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री यांना धुळ्यात कृषी विद्यापीठ स्थापण्यासाठी जळगांवच्या एकनाथराव खडसेंचा अडथळा वाटतो, ही वस्तुस्थिती आहे. खडसे हे फक्त जळगांवचे नेते नाहीत तर विशाल खान्देशचे नेते आहेत. हे मोठेपण त्यांनी नाकारु नये. आम्ही त्यांना आजही विशाल खान्देशचेच नेते मानतो. पश्चिम महाराष्ट्रातील नेते एकत्रित होवून विकास पदरात पाडतात, या विधानावर आम्ही खडसेंशी सहमत आहोत, आपणही याबाबत एकत्र येऊ या व यात मोठ्या भावाची भूमिका खडसेंनी धुळ्याच्या बाबतीत बजवावी, असेही प्रा.पाटील यांनी म्हटले आहे.

खडसे मंत्री मंडळाबाहेर असल्याने खान्देशच्या विकासाबाबत नुकसानच होत आहे. मात्र या गोष्टींशी आमचा संबंध नाही, हा त्यांच्या भाजपा पक्षांतर्गतचा विषय आहे. खडसे मंत्रिमंडळात असते तर गेल्या वर्षभरात खान्देश अजून पुढे गेला असता.

आज खडसे मंत्रिमंडळात नसल्याने खान्देशचे मोठे नुकसान होत आहे, हे मलाही मान्य आहे, असे पाटील म्हटले.
नाथाभाऊंचे तुम्ही धुळेकर मन वळवा, आम्ही धुळ्यात कृषी विद्यापीठ जाहीर करतो. या आपल्याच पक्षातील मंत्र्यांच्या विधानांनाही नाथाभाऊंनी गांभीर्यपुर्वक घेणे आवश्यक आहे. आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिले तर कृषी विद्यापीठ जाहीर होवू शकते, असेही प्रा. शरद पाटील यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*