देशदूत’ आयोजित सायकल रॅली यशस्वी करण्याचा निर्धार

0
धुळे | प्रतिनिधी :  ‘देशदूत’ची सायकल रॅली एक अभिनव उपक्रम आहे. या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन करतानाच रॅली यशस्वी करण्याचा निर्धार आज करण्यात आला. सायकल रॅली नियोजनासंदर्भात दै.देशदूत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आरोग्यासाठी सायकल हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचा वापर सर्वांनी करणे अपेक्षित आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

‘देशदूत’तर्फे दि.१४ सप्टेबर रोजी धुळ्यात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात नियोजनासाठी आज देशदूत कार्यालयात बैठक घेण्यात आली.

या बैठकीला ‘देशदूत’चे संपादक हेमंत अलोने, व्यवस्थापक सुनिल बहाळकर, धुळे वाहतूक शाखेचे निरीक्षक एफ.एस.पठाण, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) डी.बी.पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऍड.पंकज गोरे, रस्ता सुरक्षा फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश नेरकर हाजी मोहम्मद उस्मान मराठी शाळेचे शिकलीकर मोहम्मद रईस राज मोहम्मद, पिंपळादेवी माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रा.एस.डी.बाविस्कर, शिक्षक योगेश राजेंद्र मराठे, सातपुडा विद्यालयाचे उपशिक्षक सुधीर सोनगरे, निसर्गमित्र समितीचे प्रेमकुमार अहिरे, जिजामाता कन्या विद्यालयाचे बी.टी.पाटील, कमलाबाई कन्या शाळेच्या सौ.मनिषा पी.पवार, महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयाचे योगेश शिंदे, न्यु सिटी हायस्कूलचे नरेंद्र एम.जोशी, सातपुडा विद्यालयाचे के.व्ही.ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यासाठी काळजी घेणे काळाची गरज आहे. यासाठी सायकल हा उत्तम पर्याय आहे. सद्य:स्थितीत पर्यावरण संतुलन बिघडत चालले आहे. प्रदुषण रोखण्यातही सायकलची भुमिका मोठी ठरते. पर्यावरण संतुलन आणि आरोग्यासाठी सायकल आवश्यक आहे, असे मान्यवरांनी सांगितले.

व्यायामाकडे दुर्लक्ष केले जाते. शाळेतही पीटीचा तास सोडला तर व्यायाम केला जात नाही. त्यामुळे सायकल हे व्यायामासाठीचे एक उत्तम साधन आहे. पर्यावरण राखण्यासाठी महिन्यातून एक दिवस प्रत्येकाने सायकल वापरली पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असेही मान्यवरांनी सांगितले.

रॅलीत सायकलचा वेग कमी ठेवावा, प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत चार शिक्षक असणे गरजेचे आहे. चौक पार करतांना वाहतूक ठप्प होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

रॅलीत कोणकोणती काळजी घेतली जावी, याबाबत मान्यवरांनी आपल्या सुचना मांडल्या. रॅलीत वैद्यकीय पथके, ऍम्बुलन्सची सुविधा राहणार आहे. वाहतुकीसंदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत मते मांडण्यात आली.

सायकल रॅलीच्या मार्गांवर स्वंयसेवक आणि पोलिस यंत्रणा मदतीसाठी उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. जाहिरात व्यवस्थापक कैलास सोनवणे यांनी रॅलीबाबत बैठकीत माहिती दिली.

विविध वेशभूषेतील विद्यार्थी

रॅलीला शहरातील नगावबारीपासून सुरुवात होवून समारोप पांझरा नदीकिनारी शिवाजी रोडवर होईल. रॅलीत विविध वेशभूषेतील विद्यार्थी सहभागी होतील. घोषवाक्य, पर्यावरण संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांजवळ राहील. रॅलीत कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी होणार नाही. प्रत्येक चौकात स्वयंसेवक राहतील. ते विद्यार्थ्यांची काळजी घेतील, असे बैठकीत सांगण्यात आले.

‘देशदूत’ची समाजाशी बांधीलकी

रॅलीसंदर्भात माहिती देताना देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांनी सांगीतले की, ‘देशदूत’ नेहमी समाजासोबत राहिला आहे.‘देशदूत’ने पत्रकारीतेचे व्रत जोपासतानाच समाजाशी एक अनोखे नातं देशदूतने जोपासलं आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशदूत घराघरात पोहचला असून समाजाची गरज ओळखून ‘देशदूत’ नाविन्यपुर्ण उपक्रम सातत्याने राबवित असतो.

त्याचाच भाग म्हणून सायकल रॅली घेण्यात येत आहे. यातून समाजात आरोग्य आणि पर्यावरण, इंधन बचत, वृक्षलागवड आदी विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*