गणरायाच्या स्वागतासाठी मंडळे सज्ज

0
फागणे | वार्ताहर :  गणरायाच्या आगमनाची ग्रामीण भागातही उत्सुकता असून श्री.गणेशाच्या स्वागतासाठी युवा मंडळी सज्ज झाली आहे. दरम्यान गणेशोत्सवासाठी परिसरात तयारीस वेग आला आहे. बालगोपालांतही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिसरातील युवा मंडळींसह बाल गोपालांमध्ये बर्‍याच दिवसांपासून गणेशोत्सवाबाबत उत्सुकता होती. गेल्या दीड महिन्यांपासून रुसलेल्या पावसामुळे सर्वत्र उदासिनतेचेच वातावरण परिसरात होते. मात्र पोळ्याच्या पुर्वसंधेला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांसह सर्वांनाच सुखद धक्का बसला. परिसरात समाधानकारक स्थिती जाणवली. साहजिकच गणेशोत्सवाबाबतही परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.

परिसरात दरवर्षी काही लहान-मोठ्या मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जातोे. परंतु शेतकर्‍यांची गेल्या काही वर्षापासून समाधानकारक स्थिती नसल्याने गणेशोत्सव साध्या पध्दतीनेच साजरा करण्यावर अनेकांचा भर असतो. यावर्षीही बहुतांशी मंडळांनी गणेशोत्सवाच्या तयारीस प्राधान्य दिलेले असले तरी केवळ आकर्षक गणेश मूर्तीची स्थापना करुन फक्त रोषणाईवर भर देण्याचाच बहुतेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मनोदय व्यक्त केलेला आहे.

परिसरात यामुळे अत्यल्प ठिकाणीच सजावट व देखावा उभारला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.परंतु गणरायाच्या स्वागतासाठी सवाद्य मिरवणूकीचे मात्र परिसरातील कार्यकर्ते नियोजन करु लागले असून बहुतांशी मंडळांचा श्री गणेशाचे थाटात स्वागत करण्याचा मानस आहे.

तर गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रबोधनात्मक सांस्कृतिक तसेच मनोरंजनासह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत काही मंडळींकडून विचार-विनिमयही सुरु झालेला आहे. युवा मंडळींसह बाल गोपालांमध्येही गणेशोत्सवाबाबत लगबग सुरु झालेली जाणवत आहे.

गल्लीबोळात ठिकठिकाणी बालगोपाल एकत्र येवून घराच्या ओट्यावर गणेशमुर्ती स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर काही मंडळी आपल्या घरातच दर्शनी भागात गणेशमूर्तीची स्थापना करुन सजावटीसह घरातील मंडळींचा उत्साह द्विगुणीत करण्याच्या प्रयत्नात आहेत. सहाजिकच त्यांच्यातही धावपळ वाढली आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाळी वातावरण जरी परिसरात असले व पावसामुळे काही अडचणींना जरी उत्सवाप्रसंगी कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागणार असले तरी पावसाची परिसरात नितांत आवश्यकता असल्याने गणेशोत्सवासोबत पावसाचेही स्वागत करण्याची मागणी मात्र सर्वांमध्येच निर्माण झालेली आहे.

त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता गृहीत धरुनच कार्यकर्तेही पर्यायी व्यवस्था करुन गणेशोत्सव साजरा करण्याच्या मनस्थितीत आहेत.

LEAVE A REPLY

*