पिंपळनेर मार्केट कमिटीतील वाद मिटला

0
पिंपळनेर । दि.17 । वार्ताहर-कांद्याचा दर घसरल्याने शेतकर्‍यांनी मार्केट बंद करण्याचा इशारा दिला होता. तर मार्केट कमेटीतर्फे मार्केट सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र मार्केट कमिटीचे चेअरमन पोपटराव सोनवणे यांनी आज व्यापारी व शेतकर्‍यांची बैठक घेवून चर्चेतून वाद मिटवून कांद्याचा लिलाव मार्केटमध्ये केला.
यावेळी व्यापार्‍यांतर्फे प्रा.किरण कोठावदे शेतकर्‍यांंकडून महेश मराठे, बाळू सोनवणे, शशिकांत भदाणे, यांनी भाग घेतला. आज कांदा 1100 ते 2200 पर्यंत भाव मिळाला. सात दिवसाच्या आत धनादेशाद्वारे शेतकर्‍यांना पैसे मिळणार आहेत.
काल (दि.16) कांद्याला कमी भाव मिळाल्याने मार्केटमध्ये व्यापारी व शेतकर्‍यांमध्ये तू-तू मै-मै झाली. त्यामुळे शेतकर्‍यांनी दि.21 ऑगस्टपर्यंत मार्केट बंद पाडण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र मार्केट बंद राहणार नाही. ज्या शेतकर्‍यांना कांदा विक्रीसाठी आणावयाचा ते आणू शकतात, ज्यांना भाव परवडला त्यांनी विकावा व ज्यांना परवडणार नाही त्यांनी माल परत न्यावा, अशी भुमिका मार्केट कमिटीतर्फे घेण्यात आली होती. त्यासाठी पिंपळनेर पोलिस व तहसीलमध्ये निवेदन देवून मार्केट कमिटीने संरक्षण मागीतले होते. या पार्श्वभुमिवर आज 11 वाजता मार्केटमध्ये शेतकरी व व्यापार्‍यांची बैठक चेअरमन पोपटराव सोनवणे यांनी घेतली.

यावेळी शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांचा मनमानी कारभार, चेक दिर्घ कालावधीचा देणे, इतर मार्केटप्रमाणे बोली करावी, मार्केट सकाळी 10 वाजता सुरु झाले पाहिजे, 10 हजारापर्यंत रोखीने पैसे लगेच द्यावे, अशा अनेक व्यथा महेश मराठे, बाळु सोनवणे, शशिकांत भदाणे यांनी मांडल्या.

त्यावर चेअरमन सोनवणे म्हणाले की, शेतकर्‍यांना 24 तासाच्या आत पैसे देणे अनिवार्य आहे. पण शेतकर्‍यांनी ही आपला माल लिलाव कोर्‍या कागदावर करू नये. मार्केट कमेटीची पावती घेतली पाहिजे, तसेच शेतकर्‍यांनी केवळ वाद घालू नये.

तक्रार असल्यास शेतकर्‍याने स्वतः मार्केट कमेटी प्रशासनाकडे लेखी तक्रार द्यावी.त्याची दखल घेतली जाईल.ज्यांचा माल नसतो, ते पण वातावरण कलुषीत करु पहातात. मार्केट कमेटीमध्ये मध्यस्तीनेच तोडगा निघेल, असेही ठणकावले.

त्यानंतर चेअरमन पोपटराव सोनवणे यांनी व्यापार्‍यांची स्वतंत्र बैठक घेतली. त्यात व्यापारी वर्गातर्फे प्रा.किरण कोठावदे यांनी चर्चा केली. व्यापारी मनमानी करतच नाहीत.

ज्यावेळी मालाची आवक वाढते तेव्हा आम्हा व्यापार्‍यांकडे मात्र ठेवण्यास जागा नसते. त्याचवेळी मार्केट प्रशासनाला सांगून 2/3 दिवस मार्केट बंद ठेवली जाते.

काही शेतकरी 10-12 दिवसाचा चेक दिला गेला असेल. पण कमीत कमी 7 दिवसाची मुदत द्यावी. व्यापारी असा माल घेत नाही. शेतकर्‍यांना आम्ही मालाच्या प्रतवारीवरच भाव देतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना खराब माल घेण्यास बळजबरी करू नये. आम्ही सकाळी 11 वाजता मार्केट करण्यास तयार आहोत, असे सांगितले.

कांदा व्यापारी नासिर सैय्यद (आर.के.) यांनी मार्केट प्रशासनाला सांगितले की, मार्केटमध्ये शिस्त नाही. वाहने निट लावले जात नाहीत, त्यासाठी टोकन व्यवस्था करावी व राष्ट्रीयकृत बँकेच्या चेकऐवजी मोती बँक तसेच इतर बँकेचा चेक दिला जावा. त्यांनाही 7 दिवसात पैसे देवू ग्वाही दिली. टोकन प्रमाणेच लिलाव होईल याची व्यवस्था करावी असे सांगितले.

व्यापारी व शेतकर्‍यांच्या चर्चेतून मार्ग काढत चेअरमन पोपटराव सोनवणे यांनी शेतकर्‍यांनी खराब कांदे आणू नये. प्रतवारीप्रमाणे व्यापारी शेतकर्‍यांना बाहेरील मार्केट प्रमाणे भाव देतील.

प्रत्येक अन्यायग्रस्त शेतकर्‍यांने लेखी तक्रार मार्केट प्रशासनाकडे द्यावी. त्यांना न्याय देऊ. व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या समस्या जाणून व्यवहार करावा, अशी समज देण्यात आली. 1100, 1300, 1700 ते 2200 ते पर्यंत भाव मिळाली व शेतकरी व्यापार्‍यांची कोंडी सुटली.

यावेळी मार्केट प्रशासनाकडून चेअरमन पोपटराव सोनवणे, गजेंद्र कोतकर, प्रभाकर भदाणे, जगदीश चौरे, त्र्यंबकराव सोनवणे, टिकाराम बहिरम, बापू भवरे, साक्री येथे सचिव मोरे, पिंपळनेर शाखा अधिकारी संजय बावा यांनी सहभाग घेतला. तर व्यापारी वर्गातर्फे प्रा.किरण कोठावदे, प्रभाकर कोठावदे, नासिर सैय्यद, सोमनाथ कोठावदे, दिलीप भदाणे, पिंटू भदाणे, उमेश कोतकर, प्रमोद कोठावदे, हर्षद काकुस्ते, अरुण नंदन, निलेश चौधरी, अमोल पाटील, लक्ष्मण पाटील, भाऊसाहेब मराठे यांनी सहभाग घेतला.

शेतकरी प्रतिनिधी म्हणून महेश मराठै, बाळू सोनवणे, भटू जिभाऊ आकलाडे, सतिष पाटील, बापू माळचे,सुुभाष आकलाडे, सुनिल धायबर, संजय जगताप, अमोल पाटील, प्रताप पाटील, शशिकांत भदाणे, राहुल पाटील, नितीन पाटील, निसार पटेल, नारायण भदाणे, राजू पाटील, हेमंत पगारे, गिरीष पगारे, प्रभाकर सोनवणे, दादाजी सोनवणे, शरद चव्हाण, राजेंद्र अहिरे, कैलास सोनवणे, कैलास घरटे, संजय भदाणेसह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

*