Video : ‘डी.जे.आँन्टी साँग’मधून खान्देशी कलावंत झळकणार

0
धुळे । प्रतिनिधी-जिल्ह्यातील साक्री येथील मुळ रहिवासी असलेला प्रशांत जाधव हा गेल्या 5 वर्षापासून नासिक येथे कला क्षेत्रात कार्यरत आहे.
त्याच्या कलागुणांना रसिक प्रेक्षकांची चांगली साथ मिळत आहे. प्रशांतच्या ‘डी.जे.आँन्टी’ या गाण्याला आता म्युझिक कंपनीची साथ मिळाली असून मराठी संगीत वाहिन्यांवर झळकण्याची संधी मिळाली आहे.

या कंपन्यांनी या नवोदीत खान्देशी कलावंताची कला संगीत वाहिन्यांवर झळकविण्याचा निर्णय घेतला आहे. येणार्‍या गणपती उत्सवात ‘डी.जे.आँन्टी’ ह्या गाण्यावर तरुणाई थिरकेल असा विश्वास प्रशांतने व्यक्त केला आहे. हे गाणे स्वत: प्रशांतनेच लिहिले असून स्वत:च गाईले आहे. गौरव-आशिश या जोडीने हे गाणे संगीतबध्द केले आहे.

या गाण्यात प्रशांत व नाशिकची तरुणी नेहारीका हे मुख्य कलाकार म्हणून दिसणार आहेत. त्यांच्या बरोबर आतिश बैरागी, पुजा भट, शाहरुख खाटीक आदी कलाकार आहेत.

विशेष म्हणजे यातील सर्व कलाकार साक्री, धुळे व नासिक येथील असून या अल्बमचे चित्रीकरणही नाशिकातच झालेले आहे.

वेदांत सौंदाणकर यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. या अल्बममध्ये जवळपास 70 कलाकार उत्तर महाराष्ट्रातील आहेत.

या गाण्यासाठी प्रशांतलागजेंद्र सोनवणे, सुनिल पिळोदेकर, रामदास बैरागी, विक्की साऊंड ट्रॅक व ओ.एस.ओ. गृप व शिवराजसिंग, स्वप्निल बेणुस्कर, खंडेराव पवार यांनी विशेष सहकार्य केले, असे प्रशांतने सांगितले आहे. यापुर्वी प्रशांतने चार गाणे केले असून त्याचे ‘मेरी याद मे तु’ या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली आहे.

साक्रीतील कारपेंटरचा मुलगा झाला गायक : साक्री तालुक्यातील कासारा येथील कारपेंटरचा मुलगा असलेल्या प्रशांतने साक्री येथील उमिया ट्रेडर्समध्ये अनेक दिवस काम केले. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी प्रशांत नाशिकला गेला. त्याठिकाणी त्याने लव्ह सेव्हन आर्केस्ट्राच्या रूपाने कलावंतांना एकत्र आणले. त्यातून त्याच्या कलेची वाहवा होऊ लागली. त्यानंतर त्याने प्रायोगिक तत्वावर काही गाणी स्वत: तयार केली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तरूणांना भुरळ घालणारे ‘डिजे’ ऑन्टी’ हे 70 कलावंतांचा सहभाग असलेले गाणे त्याने तयार केले आहे. विशेष म्हणजे या गाण्याला म्युझिक कंपन्यांकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला. आता लवकरच हे गाणे विविध वाहिन्यांवर झळकणार आहे.

 

LEAVE A REPLY

*