धुळे जिल्ह्यात 248 कोटी पीक कर्जाचे वाटप

0
धुळे । दि.16 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील 28 हजार 626 शेतकर्‍यांना 248 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतीचे आधुनिकीकरण करावे.
तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. पालकमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, महापौर कल्पना महाले, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती मधुकर गर्दे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे , राजेंद्र पाटील, शुभांगी भारदे, रवींद्र भारदे , उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय बोरुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे आदि उपस्थित होते.

 

पुढे बोलतांना पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले की, जिल्ह्यातील 39 मंडळांपैकी 10 महसूल मंडळात 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत 4 लाख 35 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. सद्य:स्थिीत पावसाने दडी मारली आहे.

मात्र, शासन शेतकर्‍यांना साहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर आहे. शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 ची घोषणा केली आहे.

या योजनेंतर्गत 38 हजार 700 शेतकर्‍यांना अर्ज वितरीत केले आहेत. डॉ. पंजाबाराव देशमुख व्याज सवलत योजनेत नियमित कर्जफेड करणार्‍य 38 हजार 237 शेतकर्‍यांना सुमारे साडेचार कोटी रुपयांचे अनुदान वितरीत केले आहे.

तसेच बाजार समितीत जुलै व ऑगस्ट 2016 मध्ये कांदा विक्री करणार्‍या पात्र 2200 शेतकर्‍यंना सुमारे 86 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

गाळमुक्त धरण अभियानात जिल्ह्यात 2 लाख 44 हजार 639 घनमीटर गाळ काढण्यात आला. यामुळे 2155 हेक्टर क्षेत्र सुपीक होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात 29 व 30 ऑगस्ट 2017 रोजी अवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन पालकमंत्री भुसे यांनी यावेळी केले.

 

 

LEAVE A REPLY

*