सत्यशोधक जनआंदोलनातर्फे ‘भिक मांगो’ आंदोलन आज !

0
धुळे । दि.10 । प्रतिनिधी-ओबीसींच्या न्याय हक्कासाठी व ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्ती माघार घेणार्‍या शासनाला धडा शिकविण्यासाठी सत्यशोधक जनआंदोलनतर्फे उद्या दि.11 ऑगस्ट रोजी शहरातील जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भिक मागो आंदोलन करण्यात येणार आहे.
घटनात्मक तरतुदीमुळे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मंडल आयोग गठीत करण्यात आला. त्यानुसार गावकुसच्या आतील मागासवर्गीय असलेल्या कुणबी, तेली, माळी, कोळी, सोनार, साळी, लोहार, सुतार, न्हावी, भावसार, गवळी आदी जातीचा नोकरी व शिक्षणातील आरक्षणाचे लाभ मिळायला लागले.
तत्कालिन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणीची घोषणा केली. मात्र, मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी अंमलात येवू नयेत म्हणून प्रयत्न झाले.

तसेच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचाही प्रश्न मागे पडला. एका बाजूला ओबीसी शिष्यवृत्तीतील हिस्सा अदा करायचा नाही आणि दुसर्‍या बाजूला मात्र देशातील बड्या उद्योगपतींना कर्ज देखील माफ करायचे, अशी दुटप्पी भूमिका केंद्र शासन घेत आहे.

350 कोटी रुपयांचे अनुदान अदा न केल्यामुळे ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी समाजकल्याण विभागात फेर्‍या मारत आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातून हद्दपार करण्याच्या शासनाच्या धोरणाचा सत्यशोधक जनआंदोलन निषेध करीत आहे.

उद्योगपतींना कर्ज माफ करणार्‍या सरकारच्या तिजोरीत पैसा नसेल तर भिक मागून पैसा देवू, असा निर्धार सत्यशोधक जनआंदोलनाने व्यक्त केला आहे.

त्याचाच भाग म्हणून उद्या दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता भिक मागो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला समाजकल्याण अधिकारी कार्यालयापासून सुरुवात होवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाची सांगता होईल.

या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन कॉ.नरेंद्र चौधरी, कॉ.राहूल वाघ, वसीम अत्तार, नितीन पाटील, मनोज नगराळे, राकेश अहिरे, सागर पाटील, ज्ञानेश्वर माळी, निखिल गवळी, सागर पाखळ, प्रतिक बागूल, भूषण पाटील, सिध्दांत बागूल, शिवाजी वाघ, भूषण ब्राम्हणे आदींनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*