मेहरगाव-देवभाणे कालव्यासाठी 12 कोटींचा निधी

0
धुळे । दि.7 । प्रतिनिधी-अक्कलपाडा धरणाचा मेहरगांवपासून देवभाणेपर्यंत नव्याने करावयाचा कालवा 29 कि.मी.लांब आहे. अक्कलपाडा धरणातील अतिरिक्त पाणी नैसर्गिक उताराने देवभाणे धरणामध्ये पोहचेल.
सदर कामासाठी 10 कोटी 24 लाख रूपये इतका खर्च 2016-17 च्या अपेक्षित आहे. परंतु 2017-18 या आर्थिक वर्षातील खर्च गृहीत धरून 12 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
धुळे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एक्सप्रेस कॅनॉलप्रमाणे सदर कॅनॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. अक्कलपाडा धरणातील अतिरिक्त पाणी सदर कॅनॉलने देवभाने धरणापर्यंत नैसर्गिक उताराने पोहचणार आहे.

यासाठी एक रूपया विजेचा खर्च येणार नाही, अशी माहिती आ. अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आ. गोटे म्हणाले की, 25-30 कि.मी.चा कालवा नाल्यामध्ये पाणी सोडल्यानंतर हे पाणी भात नदीमध्ये जाईल. भात नदीवरील देवभाने धरण गेल्या 30 वर्षात आजपर्यंत केवळ तीन वेळाच धरण पूर्ण क्षमतेने भरले.

इतर वेळी 55 ते 60 टक्केच पाण्याचा साठा देवभाने धरणात भरतो. मेहरगाव येथून कॅनॉल केल्यास देवभाने धरण पूर्ण भरू शकेल.

देवभाने धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास रामनगर, तिसगांव, वडेल, ढंढाणे, सायणे, नंदाणे, देवभाने, कापडणे, धणून, सरवड या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकतो.

मेहरगावजवळ कॅनॉल केल्याने देवभाने धरणाच्या खालच्या बाजूस असलेल्या सोनवद प्रकल्पात पाणी साठवता येईल. यामुळे धुळे तालुक्यातील किमान 20-25 गावांचा पिण्याचा पाण्याचा व हंगामी बागायतीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल.

आ. गोटे पुढे म्हणाले की, नव्या कॅनॉलसाठी 12 कोटी रूपयांचा निधी लागणार आहे.या सर्वेक्षणासाठी जिल्हा नियोजन मंडळातून 10 लक्ष रूपये उपलब्ध करून देण्यात आले होते.

निरनिराळया स्तरावरील मान्यता निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर मेहरगांव येथे नव्याने कराव्याच्या एक्सप्रेस कॅनॉल फेजच्या कामासाठी नदीजोड प्रकल्प जलसंपदा विभागाकडून 12 कोटी रूपये उपलब्ध करून देण्यासंबंधी आदेश झाले आहेत.

सदर कॅनॉलमुळे मेहरगांव, देवभाणे, कावठी, निमडाळे, गोंदूर, वलवाडी, चिचगांव, ढंढाणे, वडेल, देवभाने या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल.

बारमाही पिकांसाठीसुध्दा पाण्याचा उपयोग होऊ शकेल.सदर कॅनॉलचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू करून मार्चपर्यंत पूर्ण करावेत,असे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत.

श्रेयवादामुळे प्रकल्प लांबला
सलग 35 वर्षानंतरही प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.कधी निधी उपलब्ध झाला नाही तर कधी पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित करून काम लांबणीवर पडण्यासाठी काही राजकीय नेते कार्यरत राहिले. धुळे – शिंदखेडा तालुक्यात हे दुष्काळाचे पाचवे वर्ष असून निसर्गावर शेती करणारा शेतकरी मोडून पडलेला आहे. मी स्वत: 2002-2003 मध्ये या पाटातून मेहरगांव, निमडाळे, गोंदूर हे बंधारे भरून घ्यावेत, अशी मागणी केली होती. दुर्दैवाने राजकीय श्रेयवादामुळे ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही. यानंतर 2005-06 तसेच 2011-2013 या कालावधीत परिसरातील शेतकर्‍यांनी बर्‍याचदा मागणी मांडली. आंदोलने केली. परंतु शासनाने कधी त्यांची दखल घेतलेली नव्हती.

गिरीश महाजनांनी आश्वासन पाळले
अक्कलपाडा धरणातील अतिरिक्त पाणी डाव्या कालव्यातून सोडावे, याकरीता किरण पाटील व त्यांच्या अन्य सहकार्‍यांच्या प्रेरणेने मेहरगांव, चिचगाव, ढंढाणे, वलवाडी, भोकर, निमडाळे परिसरातील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले होते.त्या आंदोलनास हिंसात्मक वळण लागल्यामुळे शेतकर्‍यांना पोलीसांकडून मारहाण करण्यात आली होती.राज्य शासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेतली होती.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने धाव घेवून शेतकर्‍यांच्या अडचणी व मागण्या समजवून घेतल्या. स्वत: घटना स्थळावर जावून पहाणी केली. 1 वर्षाच्या आत कॅनॉलचे काम पूर्ण केले जाईल, असे कबूल केले होते. कामाच्या पुर्ततेची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती.

गुड्ड्या हत्याकांड आरोपींना मदत करणार्‍यांवर व्हावी कारवाई
दरम्यान, यावेळी गुड्डया हत्याकांडावरही आ. गोटे यांनी मत व्यक्त केले ते म्हणाले की, मी मुंबई क्राईम बँचकडे तपास सोपविण्याचे सांगितल्यावर स्थानिक पोलीस प्रशासनावर विश्वास नसल्याचे बोलले जाते. मग दंगलीच्या वेळेस सीबीआयची मागणी का करतात, तेव्हा विश्वास नसतो का? असा सवाल करुन गोटे म्हणाले की, गुड्डया हत्याकांडप्रकरणी संशयित आरोपींना पोलसांनी अटक केलेली असली तरी त्यांना पकडले की, सरेंडर झाले याबाबत माहित नाही. मात्र तपासावर दुष्परिणाम होवू नये यासाठी मी सध्या बोलणार नाही. पाच लाख नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लोक प्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे.त्यासाठीच मी मुंबई क्राईम ब्रँचची मागणी केली. गेल्या आठवडाभरापासून क्राईम ब्रँचचे तीन अधिकारी धुळ्यात दाखल आहेत, असे सांगुन आ.गोटे म्हणाले की आरोपींना मदत करणारे कोणीही असो कारवाई झाली पाहिजे, ही माझी भूमिका राहील. गुड्ड्या हत्याकांडाच्या तपासासाठी लवकरच आयपीएस दर्जाचा अधिकारी धुळे शहरात दाखल होणार असून त्यांचे स्वतंत्र कार्यालय सुरु केले जाणार आहे, अशी माहिती आ.गोटे यांनी दिली.

 

 

 

LEAVE A REPLY

*